नाव : विष्णू थोरे
साहित्यिक परीचय : कवी-गीतकार
नाशिक जिल्ह्यातील 'चांदवड' या खेडेगावातील शेतकरी कुटुंबात जन्म झालेले कवी विष्णू थोरे यांचं बालपण शेत वावरात आणि पिक उगवणाऱ्या मातीत झालं.तिथेच ते मोठे झाले.एम ए (मराठी) पर्यंत त्यांचे शिक्षण झाले तरीही त्यांनी त्यांच्या वावराशी नात तोडलं नाही तर शेतकरी म्हणून जवाबदारी निभावून मातीशी घट्ट केलं.त्यातच कलेची आवड म्हणून चित्रकलेला पसंती दिली आणि हि कला आत्मसाद केली.
ते उत्कृष्ट चित्रकार आहेत. आजवर त्यांनी सुमारे ४५० मुखपृष्ठांची निर्मिती केली ज्यात अनेक मान्यवर-नामवंत कवी,लेखक आणि साहित्यिकंपासून ते ग्रामीण,स्थानिक कवी,लेखकांच्या काव्यसंग्रह आणि लेखसंग्रहाचा समावेश आहे. त्यांनी साकारलेल्या मुखपृष्ठांना अतिशय मार्मिक आशय,विषयानुरूप संवेदनशील रंगछटा यातून पारंपरिक तसेच आधुनिक शैलीच प्रभावी स्वरूप प्राप्त होत. आणि रचनात्मक अभिकल्पना साकारून येते.
कलेच्या या माध्यमातून त्यांच्यातील कवी मन वेळोवेळी प्रत्ययास आले आहे आणि त्यातूनच त्यांचा 'धुळपेरा उसवता...' या काव्यसंग्रहाची निर्मिती झाली आणि हा काव्यसंग्रह नुकताच वर्षभरापूर्वी प्रकाशित झाला.ज्यात त्यांनी शेतीच्या,मातीच्या,कुंपणाच्या,
तिफनाच्या,नांगराच्या,झाडांच्या,माणसांच्या,जीवाच रान करणाऱ्या बापाच्या,राब राब राबणाऱ्या मायच्या,वावरातील बैलांच्या,शेतकऱ्यांच्या दुःखाच्या कविता लिहिल्या आहेत.
ग्रामीण भागात शेतात जीवाचं रान करणाऱ्या शेतकरी आणि शेतीविषयी त्यांच्या 'सांजदिवे' या कवितेत ते लिहितात...
"ओलावल्या मातीनेच
रुजायला दिला लळा...
भोगताना दुःख नवे
मातीलाच पुन्हा कळा..."
तसेच जिवाच्या आकांताने कष्ट करूनही शेतकऱ्याच्या वाट्याला दुःखच येत तेव्हा ते त्यांच्या 'कुपान' कवितेत लिहितात,
"पिकवून जगण्याचा
झाला भरवसा खोटा
कुणब्याच्या नशिबात
हरसाल भोगवटा..."
वावरातील असंख्य मौसमाना सहन करत वर्षों वर्ष तटस्थ उभ्या असणाऱ्या झाडांविषयी ते आपल्या 'झाडांचं सनातन दुखणं' या कवितेत म्हणतात...
"झाडांनो,
किती ऋतू,किती पक्षी
कितीतरी माणस
येत गेली तुमच्यासोबतील
कुऱ्हाडीचे अमानुष बलात्कार
झालेच की तुमच्याही देहावर
तुम्ही नाही जपले का
कुठले घाव ?
एखादी जखम
ठसठसणारी..."
एवढ्या सर्व आत्मकेंद्री विषयांचं वर्णन करताना ते आपल्या आत्मीयतेचे प्रतीक आपल्या माय विषयी लिहायला विसरले नाही.त्यांनी त्यांच्या 'ममतेची ओल' या कवितेत ते लिहतात...
"माय पोशिंदा घराची
गाढा ओढत राहिली
आम्ही शिकावं म्हणून
तिच्या उरात काहिली..
माय कस वं जमत
तुला उसनं पासण
दुःख मुखाच झाकून
हसू डोळ्यात नेसन..."
धुळपेरा उसवता...या त्यांच्या काव्यसंग्रहाविषयी ते आपल्या कवितेत कवी म्हणून भूमिका मांडतात...
"धुळपेरा उसवता
गेले काळजाला चरे...
कोणी गोजिऱ्या मोराचे
पाय खुडले नाचरे..."
'धुळपेरा उसवता' हा त्यांचा काव्यसंग्रह ग्रामीण साहित्यातील बोली भाषेतील अत्यंत प्रतिभासंपन्न आणि महत्वाचा प्रकाशझोत ठरला आहे. या काव्यसंग्रहाचे नाशिक-मनमाड-भुसावळ-जळगाव इ. ग्रामीण भागातच नाही तर मुंबई,पुणे,कोल्हापूर इ. शहरातही जोरदार स्वागत झाले आणि तो वाचकांच्या पसंतीस उतरला.बोलीभाषेतील आशय आणि शब्दशैली मुळे या काव्यसंग्रहास 'गदिमा पुरस्कार,पुणे', 'यशवंतराव पुरस्कार,पुणे',
'डॉ.न.ना.देशपांडे पुरस्कार,कोल्हापूर' या प्रतिष्टीत पुरस्कारां सोबतच अनेक इतर पुरस्कार मिळाले.
त्यांच्या काही कवितांचा चित्रपट क्षेत्रात 'गीत' म्हणून सहभागही झाला ज्यात 'चौर्य' या आगामी चित्रपटात 'पायरीला गेले तडे...' आणि 'घाटी' या चित्रपटात 'मर्द खरा शोभतो हा घाटी...' या गीत लेखनाचा सहभाग झाला आहे.
त्याचसोबत ग्रामीण भाषेतील दर्जेदार भाषा आणि शब्दशैलीचा सादरीकरण या माध्यमातून 'गाव झालंय व्हिलेज..' या माती आणि नाती जपणाऱ्या काव्यवाचन कार्यक्रम ते संपूर्ण महाराष्ट्रात खेडोपाड्यात,गावोगावी,शहरात ते आणि त्यांचे सहकारी सादर करतात.
आजच्या ग्रामीण कृषी व्यवस्थेत काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबात जन्म घेऊन शिकलेल्या तरुणांनी 'माती आणि नाती' टिकवताना कवी विष्णू थोरे यांचा आदर्श घ्यावा.
ग्रामीण भागात कृषी व्यवस्थेचं रडगाणं करत बसण्यापेक्षा शिकलेल्या ज्ञानातून आणि आत्मसात केलेल्या विविध कलेतून ग्रामीण कृषी व्यवस्था संवर्धन,ग्रामीण संस्कृती जतन आणि शेतीविषयी प्रेम,आदर आणि जिव्हाळा अधिक घट्ट करावा कारण हीच काळाची गरज आहे असे मला वाटते...
शब्द संकलन-सचिन सुशील.
'एक दिवस,एक लेखक' क्रिएटिव्ह टीम.