'एक दिवस,एक लेखक'...
नाव -
रमेश महारू बोरसे.
साहित्यिक परिचय - कवी, लेखक, त्रैमासिक संपादक.
धुळे जिल्ह्यातील 'विंचूर' ह्या खेडेगावात जन्मलेल्या रमेश बोरसे सरांचे
बालपण अल्पवयातच आईचे छत्र हरपल्यामुळे तसे कोमेजलेलेच.वडीलांनी शिक्षक,
स्वातंत्र्य लढ्यातील काही भूमिगतांची मदत, स्वातंत्र्यानंतर काँग्रेस
पक्षाचे काम,विविध संस्थांमध्ये पदाधिकारी, समाजकारण बर्याच कार्यात सक्रिय
असूनही कुटुंबासाठी धनसंचय मात्र केला नाही त्यामुळे सततची आर्थिक कोंडी.
आर्थिक परिस्थिती कायम हलाखीची, आई नसल्यामुळे उपासमार, तब्येतीच्या
तक्रारी हे सगळे सहन करून शिक्षण पूर्ण करायची धडपड चालू ठेवली. कधी
शेती, शेतमजूरी, सुरत येथे विविध ठिकाणी बालकामगार म्हणून काम करून कसेबसे
बि.ए.बि.एड. पर्यंत शिक्षण पूर्ण केले.नंतर ग्रामिण भागात शिक्षक म्हणून
रूजू झाले व अल्पावधीतच शिस्तप्रिय व विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ओळखले
जाऊ लागले. निवृत्तीनंतर किराणा दुकानही चालवले. अशाप्रकारे विविध
क्षेत्रातील अनुभवांमुळे नानाविध व्यक्ती प्रवृत्तींशी संबंध आला.
साहित्याची आवड मुळातच पण जगण्याच्या संघर्षात मागे पडलेली साहित्य साधना
निवृत्तीनंतर मात्र उत्साहात सुरू केली.
मराठीत बर्याच कविता लेखन
करूनही प्रकाशित नाही केल्या. मराठीत लेखन करून प्रसिद्धी मिळवता आली असती
पण मायबोली अहिराणीचा मृत भाषेत समावेश होऊ नये यासाठी खान्देशी बोली
अहिराणीचा प्रचार प्रसाराचा विडा उचलला. खांदेशातील 'गावकरी' ह्या वृत्तपत्रात
"आप्पान्या गप्पा" नावाने सद्य सामाजिक स्थितीवर भाष्य करणारं स्तंभ लिखाण सुरू केलं. ह्या लेखांचं संकलन करून नंतर "आप्पान्या गप्पा भाग १" हे पुस्तक प्रकाशित झालं.ह्यात व्यक्ती चित्रणे, बैल - कपिला गाय यांसारख्यां प्राण्यांचं
शेतकर्याच्या जीवनातील महत्व, खांदेशी सणांची वैशिष्ट्ये, दासबोधातील गुण
विवेचन सोप्या ओघवत्या खांदेशी शैलीत मांडले.
" मायनी याद वनी, मन भरी वनं,
कायीजनं पाणी व्हयनं...
ते आसू गाईसन वाहू दिधं नही,
शाईवरी कागदवर उतारं... "
....असं वर्णन करत पहिल्या लेखात आईचं वर्णन केलं.
" आप्पान्या गप्पा - भाग २रा" ह्या दुसर्या प्रकाशित पुस्तकात
हुंडा..बस्ता अशा चुकीच्या - मुलीला व पालकांना वेठीस धरणार्या रूढी,
राजकारण, समाजकारण, शिक्षणपद्धती अशा विविध विषयांवर भाष्य केले.
"
पूरणपोयी" ह्या काव्यसंग्रहात सोप्या शब्दात तत्वज्ञान सार कथन करणार्या
बहिणाबाईंची परंपरा जोपासत सुंदर खांदेशी बोलीत विविध कविता आहेत.
"जे सर्वास्ले भिंगरीना मायक फिरावस, त्यालेज मन म्हणतस"
अशा मोजक्या शब्दांत मनाला अचूक बांधले.
" खेडामा र्हाणार कुणबी
हंगाममा धान्य न्या राशी पिकाडस,
त्याज कुणबी थोडाज दिनमा
रेशन नी रांगम्हा उभा दिखतस"
...असं म्हणत समाजातलं विरोधाभासी चित्र दर्शवणारी कविता.
'खरं धन' ही लता दिदिंवरील व्यक्ती गौरवपर कविता,
' इसनू रोतडी खेयेल शे" ,
'येकदिन' अशा समाजातील अन्यायावर भाष्य करणार्या विद्रोही कवितांचा यात
समावेश आहे.
"हिरवं बेट" ही अर्धांगिणिचं महत्व विषद करणारी कविता अहिराणीतही स्री जाणिवा उल्लेखाची सुरूवात करणारी ठरते. खास अहिराणी वाक्प्रचार, अस्सल खांदेशी उपमा ,शब्द कोट्या , विद्रोह,
प्रयोगशिलता, प्रासादिकता इ. वैशिष्टे असलेल्या कवितांनी सजलेला पूरणपोयी
हा काव्यसंग्रह...
"दिवायीना पणतिम्हा
तेल आशानं टाकजो,
मनमधला सपनले
जागेपणे रंग भरजो."
म्हणत आशावादही व्यक्त करतो...
स्वत:ची पुस्तके प्रकाशित करून न थांबता अहिराणी वाचन लिखाणाची गोडी
लागावी, अहिराणीचा प्रचार व्हावा या हेतूने " खांगेशनी वानगी" नावाने
अहिराणी त्रैमासिक सूरू केले.ह्यात विविध लेखत कवींचे कथा, कविता, माहितीपर
लेख, चारोळ्या असे विविध साहित्य प्रकार प्रकाशित केले जातात.
" आपली
मायबोली अहिराणी आमरित थाईन भी सरशी" म्हणत खांदेशी बोली अहिराणी बद्दलची
अस्मिता व्यक्त करणार्या श्री. रमेश बोरसे यांचा आपल्या मायबोलीचे रूण
साहित्य सेवेद्वारा जपण्याचा प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे..
शब्द संकलन/परीचय लेखन - हिमनील बोरसे
संकल्पना - सचिन सुशील
'एक दिवस,एक लेखक' क्रिएटिव्ह टीम.