Monday, 26 March 2018

डॉ.गंगाधर पानतावणे (दलित साहित्यिक)

डाॅ. गंगाधर पाणतावणे

जन्म : २८ जून, १९३७

एक विचारवंत लेखक, दलीत साहित्याचे अभ्यासक आणि संपादक असलेले गंगाधर विठोबाजी पाणतावणे हे मुळचे विदर्भातले. 28 जून 1937 साली नागपूर येथे त्यांचा जन्म झाला. डी.सी. मिशन स्कूल येथे त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. तर नवयुग विद्यालय आणि पटवर्धन हायस्कूल नागपूर येथे माध्यमिक शिक्षण झाले. 1956 साली मॅट्रिकची परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नागपूर महाविद्यालयातून त्यांनी बी. ए. आणि एम. ए. ची पदवी मिळवली. मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी पी. एच. डी. ची पदवीही मिळवली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक म्हणून ते अध्यापन करु लागले.
मॅट्रिक झाल्यावरच त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली होती. प्रतिष्ठान` नियतकालिकातून त्यांनी सुरुवातीला लेखन केले आणि त्यानंतर त्यांनी विविध विषयांवर विपूल लेखन केले. दलित साहित्याचा त्यांचा सखोल अभ्यास होता. त्यामुळे त्यांनी केलेले बरेच लेखन हे दलित साहित्याच्या अनुषंगाने असेच आहे. त्यापैकी `धम्मचर्चा` `मूल्यवेध` , मुकनायक, विदोहाचे पाणी पेटले आहे, वादळाचे वंशज, दलित वैचारिक वाड्गमय, किल्ले पन्हाळा ते किल्ले् विशाळगड, साहित्य, प्रकृती आणि प्रवृत्ती, साहित्य शोध आणि संवाद हे सर्व ग्रंथ वैचारिक आणि समीक्षात्मक असे आहे. अस्तितादर्श` या नियतकालिकाच्या संपादकपदाची महत्वपूर्ण जबाबदारीही त्यांनी घेतली होती. तसेच दलित आत्मकथा, दलित साहित्य, चर्चा आणि चिंतन, लोकरंग, स्त्री आत्मकथन, महारांचा सांस्कृतिक इतिहास हे त्यांनी संपादन केलेले काही ग्रंथ. चळवळीला वैचारिक अधिष्ठान देणारे नियतकालिका म्हणून अस्मितादर्श कडे पाहिले जाते.
डॉ. गंगाधर पानतावणे हे मराठीतील लेखक, समीक्षक व विचारवंत आहेत. दलित साहित्य व दलित चळवळीला वाहिलेल्या अस्मितादर्श या त्रैमासिकाचे ते संस्थापक संपादक आहेत. औरंगाबादच्या मिलिंद कॉलेजात ते मराठीचे प्राध्यापक होते.डॉ. गंगाधर पानतावणे यांनी २००९ साली अमेरिकेतील सान होजे येथे झालेल्या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भुषविले. डॉ. गंगाधर पानतावणे यांचे प्रकाशित साहित्य पत्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (प्रतिमा प्रकाशन) दलित वैचारिक वाङ्मय (समीक्षा) अर्थ आणि अन्वयार्थ (समीक्षा) चैत्य लेणी (व्यक्तिचित्रे, प्रतिमा प्रकाशन) स्मृतिशेष (व्यक्तिचित्रे, सुविद्या प्रकाशन) दुसऱ्या पिढीचे मनोगत [संपादन]संपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवडक लेख अस्मितादर्श (त्रैमासिक

Sunday, 26 March 2017

लेखक बाबुराव बागुल

बाबूराव रामचंद्र बागूल

(जुलै १७, १९३० - मार्च २६, २००८) हे दलित साहित्यासाठी ओळखले जाणारे  मराठी लेखक, कवी होते. विद्रोही दलित कथांचे प्रखर वास्तववादी कादंबरीकार तसेच शोषित, उपेक्षित, कष्टकऱ्यांच्या जनजीवनाचे भेदक चित्रण करणारे लेखक म्हणून त्यांची ओळख होती. प्रभावी भाषाशैली, जिवंत प्रसंगचित्रण, कारूण्य आणि क्रुरता रेखाटन हे त्यांच्या लेखनाचे विशेष गुण होते.

आर्थिक परिस्थितीमुळे मॅट्रिकनंतर त्यांना शिक्षण थांबवावे लागले. नोकरीच्या शोधात असलेल्या बागुलांवर त्यादरम्यान मुंबईत बळावू लागलेल्या कामगार चळवळीचा प्रभाव पडला. माटुंग्याच्या लेबर कँपातच राहत असलेल्या अण्णा भाऊ साठ्यांच्या संपर्कातून ते कामगार चळवळीत सहभागी झाले. या काळात त्यांनी साम्यवादी विचारवंतांच्या साहित्याचा अभ्यास केला. बेरोजगारी, आर्थिक-सामाजिक विषमता यांविरुद्ध या कालखंडात त्यांनी रचलेल्या कवितांमधून या विचारांचा प्रभाव जाणवतो.

१९५५ मध्ये रेल्वे वर्कशॉपात नोकरी मिळाल्यामुळे बागुल सुरतेस गेले. तेथे त्यांना जातीय भेदभावामुळे भाड्याने घर मिळत नव्हते. तेव्हा त्यांनी जात चोरून भाड्याचे घर घेतले. परंतु जात चोरून असे राहणे न रुचल्यामुळे नोकरी सोडून ते मुंबईस परतले. सुरतेतील त्या अनुभवांवर त्यांनी ’जेव्हा मी जात चोरली होती’ ही कथा लिहिली. प्रस्थापित समाजव्यवस्थेतील दोषांचे दर्शन घडवणाऱ्या त्यांच्या कथा १९६३ साली ’जेव्हा मी जात चोरली होती’ या कथासंग्रहाच्या रूपाने प्रकाशित झाल्या. नंतर १९६९ सालात ’मरण स्वस्त होत आहे’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला.

'अघोरी', 'कोंडी', 'पावशा', 'सरदार', 'भूमिहीन', 'मूकनायक', 'अपूर्वा' अशा कथा-कादंबऱ्यांनी मराठी साहित्यात नवा प्रवाह आणला. बागुलांच्या लेखनामुळे प्रभावित होऊन लिहित्या झालेल्या दलित वर्गातील लेखकांच्या लिखाणातून मराठी साहित्यात दलित साहित्याची नवी लाट आली. .....

Saturday, 21 January 2017

लाखभर साहित्यसंपदा आणि साहित्याऐवज असलेली प्राचीन गुंफा


लाखभर साहित्यसंपदा व साहित्यऐवज असलेली प्राचीन गुंफा..

लहानपणी एक गोष्ट होती 'अलिबाबाची गुफा'. आज खरोखरच एका भव्य दिव्य अलिबाबाच्या गुहेचा यथोचित अनुभव आला. सुरवातीच्या कक्षात 'सोन'...त्यातल्या आत 'सोन'...आणि त्यातल्या आत 'हिरे-दागिने-माणिक'
फरक एवढाच होता कि, या गुहेत होता तो असंख्य पुस्तकांचा,मासिकांचा,ग्रंथांचा,असंख्य लेखकांनी आजवर लिहलेल्या लेखकांचा,अनुवादित साहित्याचा,जेष्ठय समीक्षक-साहित्यिक स्व.द भि कुलकर्णी यांनी मृत्यइच्छेत दिलेल्या दहा हजार पुस्तकांचा आणि दुर्मिळ साहित्याचा 'अलौकिक साहित्य ऐवज'...आणि त्याशिवाय तिथे असलेल्या दोन लाख संदर्भ पुस्तकांचा....
हि कल्पनेतील कथा नसून वास्तवातील आहे. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर सारख्या ग्रामीण भागात असलेल्या जेष्ठय साहित्यिक-ग्रंथालय संचालक श्री.श्याम जोशी सर यांच्या 'ग्रंथसखा' या वाचनालय संस्थेची आहे. मूळ वाचनालयाच्या सोबतच श्याम जोशी सरांनी आणखी एका इमारतीच्या तळघरात वाचनालायसोबतच 'संशोधन केंद्र' निर्माण केले आहे.तेथे बसून अनेक संशोधन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना,अभ्यासकांना आणि साहित्यप्रेमींना साहित्यातील अनेक पुस्तकांचा शोध घेता येतो सोबतच आत मध्ये बसण्याची व्यवस्था आहे.तसेच तिथे ग्रंथपाल विषयीचे प्रशिक्षण वर्ग देखील चालवले जातात.
त्यानुरूप आतील दालनात पंधरा-वीस विद्यार्थी बसतील एवढी जागा आणि 'आधुनिक अध्ययन कक्ष' स्थापन करण्यात आले आहे.तसेच वाचनालयाचे वाचक वर्ग हे केवळ बदलापूर किंवा जवळील स्थानिक नसून तेथे मुंबई शहरातील कुर्ला,वडाळा,अंधेरी,दादर येथून वाचक वर्ग आणि सभासद येतात तसेच 'अध्ययन' आणि 'संशोधन' अभ्यासासाठी या संशोधन केंद्रात नाशिक,भुसावळ,लातूर ई. लांबच्या आणि मुंबई बाहेरच्या शहरातून साहित्य संशोधक,अभ्यासक आणि साहित्य प्रेमी येथे येतात इथे आल्यावर त्यांना राहण्याची गैरसोय होऊ नये म्हणून संचालकांनी स्वतंत्र  आराम खोलीची व्यवस्था केलेली आहे. सुमारे लाखभर पुस्तकांनी सुसज्ज असलेलं हे संशोधन केंद्र हे शासनाच्या अनुदानाशिवाय केवळ ग्रंथ संचालक श्याम जोशी आणि ग्रंथसखा वाचनालयातील हजारो वाचक यांच्या सहयोगाने आणि देणगीने आजवरच्या सर्व ग्रंथालय,वाचनालय आनइ संशोधन केंद्र असलेले ठाणे जिल्यातील एकमेव 'स्वायत्त मराठी विद्यापीठ' ठरले आहे.
वर्षानुवर्षे निर्मित साहित्य 'ग्रंथसखा' या वाचनालय संस्थेने आणि तेथील संचालक श्याम जोशी सर तसेच तेथील अधिकारी वर्ग आणि वाचकांनी तेथील साहित्य संस्कृती आणि वाचन परंपरा समृद्ध केली आहे. आणि या साहित्य सेवा चळवळीला दिन रात अखंडपणे वाचक आणि साहित्यप्रेमींना उपलब्ध करून देण्याची जवाबदारी आणि खऱ्या अर्थाने साहित्य संस्कृती संवर्धन,जतन करण्याचे मौलिक कार्य आजही अतिशय तन्मयतेने,निष्ठेने आणि साहित्यसेवेत आपले जीवन समर्पण करून श्री.श्याम जोशी सर करत आहे.
नुकताच सरांना महाराष्ट्र शासनाचा 'भाषा संवर्धक' हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे.
अश्या या महान साहित्यसेवे साठी अवघ जीवन झोकून देणाऱ्या श्याम जोशी सरांना  आणि त्यांच्या साहित्य सेवेला मानाचा मुजरा...

शब्द संकलन - सचिन सुशील

'एक दिवस,एक लेखक' क्रिएटिव्ह टीम

Wednesday, 18 January 2017

कवी रमेश महारू बोरसे.

'एक दिवस,एक लेखक'...

नाव - रमेश महारू बोरसे. 

  
साहित्यिक परिचय - कवी, लेखक, त्रैमासिक संपादक.

धुळे जिल्ह्यातील 'विंचूर' ह्या खेडेगावात जन्मलेल्या रमेश बोरसे सरांचे बालपण अल्पवयातच आईचे छत्र हरपल्यामुळे तसे कोमेजलेलेच.वडीलांनी शिक्षक, स्वातंत्र्य लढ्यातील काही भूमिगतांची मदत, स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्षाचे काम,विविध संस्थांमध्ये पदाधिकारी, समाजकारण बर्याच कार्यात सक्रिय असूनही कुटुंबासाठी धनसंचय मात्र केला नाही त्यामुळे सततची आर्थिक कोंडी. आर्थिक परिस्थिती कायम हलाखीची, आई नसल्यामुळे उपासमार, तब्येतीच्या तक्रारी हे सगळे सहन करून शिक्षण पूर्ण करायची धडपड चालू ठेवली. कधी शेती, शेतमजूरी, सुरत येथे विविध ठिकाणी बालकामगार म्हणून काम करून कसेबसे बि.ए.बि.एड. पर्यंत शिक्षण पूर्ण केले.नंतर ग्रामिण भागात शिक्षक म्हणून रूजू झाले व अल्पावधीतच शिस्तप्रिय व विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ओळखले जाऊ लागले. निवृत्तीनंतर किराणा दुकानही चालवले. अशाप्रकारे विविध क्षेत्रातील अनुभवांमुळे नानाविध व्यक्ती प्रवृत्तींशी संबंध आला. साहित्याची आवड मुळातच पण जगण्याच्या संघर्षात मागे पडलेली साहित्य साधना निवृत्तीनंतर मात्र उत्साहात सुरू केली.
मराठीत बर्याच कविता लेखन करूनही प्रकाशित नाही केल्या. मराठीत लेखन करून प्रसिद्धी मिळवता आली असती पण मायबोली अहिराणीचा मृत भाषेत समावेश होऊ नये यासाठी खान्देशी बोली अहिराणीचा प्रचार प्रसाराचा विडा उचलला. खांदेशातील 'गावकरी' ह्या वृत्तपत्रात "आप्पान्या गप्पा" नावाने सद्य सामाजिक स्थितीवर भाष्य करणारं स्तंभ लिखाण सुरू केलं. ह्या लेखांचं संकलन करून नंतर "आप्पान्या गप्पा भाग १" हे पुस्तक प्रकाशित झालं.ह्यात व्यक्ती चित्रणे, बैल - कपिला गाय यांसारख्यां प्राण्यांचं शेतकर्याच्या जीवनातील महत्व, खांदेशी सणांची वैशिष्ट्ये, दासबोधातील गुण विवेचन सोप्या ओघवत्या खांदेशी शैलीत मांडले.

" मायनी याद वनी, मन भरी वनं,
कायीजनं पाणी व्हयनं...
ते आसू गाईसन वाहू दिधं नही,
शाईवरी कागदवर उतारं... "

....असं वर्णन करत पहिल्या लेखात आईचं वर्णन केलं.

" आप्पान्या गप्पा - भाग २रा" ह्या दुसर्या प्रकाशित पुस्तकात हुंडा..बस्ता अशा चुकीच्या - मुलीला व पालकांना वेठीस धरणार्या रूढी, राजकारण, समाजकारण, शिक्षणपद्धती अशा विविध विषयांवर भाष्य केले.
" पूरणपोयी" ह्या काव्यसंग्रहात सोप्या शब्दात तत्वज्ञान सार कथन करणार्या बहिणाबाईंची परंपरा जोपासत सुंदर खांदेशी बोलीत विविध कविता आहेत.

"जे सर्वास्ले भिंगरीना मायक फिरावस, त्यालेज मन म्हणतस"

अशा मोजक्या शब्दांत मनाला अचूक बांधले.

" खेडामा र्हाणार कुणबी
हंगाममा धान्य न्या राशी पिकाडस,
त्याज कुणबी थोडाज दिनमा
रेशन नी रांगम्हा उभा दिखतस"

...असं म्हणत समाजातलं विरोधाभासी चित्र दर्शवणारी कविता.

'खरं धन' ही लता दिदिंवरील व्यक्ती गौरवपर कविता, ' इसनू रोतडी खेयेल शे" , 'येकदिन' अशा समाजातील अन्यायावर भाष्य करणार्या विद्रोही कवितांचा यात समावेश आहे."हिरवं बेट" ही अर्धांगिणिचं महत्व विषद करणारी कविता अहिराणीतही स्री जाणिवा उल्लेखाची सुरूवात करणारी ठरते. खास अहिराणी वाक्प्रचार, अस्सल खांदेशी उपमा ,शब्द कोट्या , विद्रोह, प्रयोगशिलता, प्रासादिकता इ. वैशिष्टे असलेल्या कवितांनी सजलेला पूरणपोयी हा काव्यसंग्रह...

"दिवायीना पणतिम्हा
तेल आशानं टाकजो,
मनमधला सपनले
जागेपणे रंग भरजो."

म्हणत आशावादही व्यक्त करतो...

स्वत:ची पुस्तके प्रकाशित करून न थांबता अहिराणी वाचन लिखाणाची गोडी लागावी, अहिराणीचा प्रचार व्हावा या हेतूने " खांगेशनी वानगी" नावाने अहिराणी त्रैमासिक सूरू केले.ह्यात विविध लेखत कवींचे कथा, कविता, माहितीपर लेख, चारोळ्या असे विविध साहित्य प्रकार प्रकाशित केले जातात.
" आपली मायबोली अहिराणी आमरित थाईन भी सरशी" म्हणत खांदेशी बोली अहिराणी बद्दलची अस्मिता व्यक्त करणार्या श्री. रमेश बोरसे यांचा आपल्या मायबोलीचे रूण साहित्य सेवेद्वारा जपण्याचा प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे..

शब्द संकलन/परीचय लेखन - हिमनील बोरसे

संकल्पना - सचिन सुशील

'एक दिवस,एक लेखक' क्रिएटिव्ह टीम.

Sunday, 13 November 2016

कवी विष्णू थोरे




नाव : विष्णू थोरे 

साहित्यिक परीचय : कवी-गीतकार

नाशिक जिल्ह्यातील 'चांदवड' या खेडेगावातील शेतकरी कुटुंबात जन्म झालेले कवी विष्णू थोरे यांचं बालपण शेत वावरात आणि पिक उगवणाऱ्या मातीत झालं.तिथेच ते मोठे झाले.एम ए (मराठी) पर्यंत त्यांचे शिक्षण झाले तरीही त्यांनी त्यांच्या वावराशी नात तोडलं नाही तर शेतकरी म्हणून जवाबदारी निभावून मातीशी घट्ट केलं.त्यातच कलेची आवड म्हणून चित्रकलेला पसंती दिली आणि हि कला आत्मसाद केली.
ते उत्कृष्ट चित्रकार आहेत. आजवर त्यांनी सुमारे ४५० मुखपृष्ठांची निर्मिती केली ज्यात अनेक मान्यवर-नामवंत कवी,लेखक आणि साहित्यिकंपासून ते ग्रामीण,स्थानिक कवी,लेखकांच्या काव्यसंग्रह आणि लेखसंग्रहाचा समावेश आहे. त्यांनी साकारलेल्या मुखपृष्ठांना अतिशय मार्मिक आशय,विषयानुरूप संवेदनशील रंगछटा यातून पारंपरिक तसेच आधुनिक शैलीच प्रभावी स्वरूप प्राप्त होत. आणि रचनात्मक अभिकल्पना साकारून येते.
कलेच्या या माध्यमातून त्यांच्यातील कवी मन वेळोवेळी प्रत्ययास आले आहे आणि त्यातूनच त्यांचा 'धुळपेरा उसवता...' या काव्यसंग्रहाची निर्मिती झाली आणि हा काव्यसंग्रह नुकताच वर्षभरापूर्वी प्रकाशित झाला.ज्यात त्यांनी शेतीच्या,मातीच्या,कुंपणाच्या,
तिफनाच्या,नांगराच्या,झाडांच्या,माणसांच्या,जीवाच रान करणाऱ्या बापाच्या,राब राब राबणाऱ्या मायच्या,वावरातील बैलांच्या,शेतकऱ्यांच्या दुःखाच्या कविता लिहिल्या आहेत. 

ग्रामीण भागात शेतात जीवाचं रान करणाऱ्या शेतकरी आणि शेतीविषयी त्यांच्या 'सांजदिवे' या कवितेत ते लिहितात...

"ओलावल्या मातीनेच
रुजायला दिला लळा...
भोगताना दुःख नवे
मातीलाच पुन्हा कळा..."

तसेच जिवाच्या आकांताने कष्ट करूनही शेतकऱ्याच्या वाट्याला दुःखच येत तेव्हा ते त्यांच्या 'कुपान' कवितेत लिहितात,

"पिकवून जगण्याचा
झाला भरवसा खोटा
कुणब्याच्या नशिबात
हरसाल भोगवटा..."

वावरातील असंख्य मौसमाना सहन करत वर्षों वर्ष तटस्थ उभ्या असणाऱ्या झाडांविषयी ते आपल्या 'झाडांचं सनातन दुखणं' या कवितेत म्हणतात...

"झाडांनो,
किती ऋतू,किती पक्षी
कितीतरी माणस
येत गेली तुमच्यासोबतील
कुऱ्हाडीचे अमानुष बलात्कार
झालेच की तुमच्याही देहावर
तुम्ही नाही जपले का 
कुठले घाव ?
एखादी जखम 
ठसठसणारी..."

एवढ्या सर्व आत्मकेंद्री विषयांचं वर्णन करताना ते आपल्या आत्मीयतेचे प्रतीक आपल्या माय विषयी लिहायला विसरले नाही.त्यांनी त्यांच्या 'ममतेची ओल' या कवितेत ते लिहतात...

"माय पोशिंदा घराची
गाढा ओढत राहिली
आम्ही शिकावं म्हणून
तिच्या उरात काहिली..

माय कस वं जमत
तुला उसनं पासण
दुःख मुखाच झाकून
हसू डोळ्यात नेसन..."

धुळपेरा उसवता...या त्यांच्या काव्यसंग्रहाविषयी ते आपल्या कवितेत कवी म्हणून भूमिका मांडतात...

"धुळपेरा उसवता
गेले काळजाला चरे...
कोणी गोजिऱ्या मोराचे
पाय खुडले नाचरे..."

'धुळपेरा उसवता' हा त्यांचा काव्यसंग्रह ग्रामीण साहित्यातील बोली भाषेतील अत्यंत प्रतिभासंपन्न आणि महत्वाचा प्रकाशझोत ठरला आहे. या काव्यसंग्रहाचे नाशिक-मनमाड-भुसावळ-जळगाव इ. ग्रामीण भागातच नाही तर मुंबई,पुणे,कोल्हापूर इ. शहरातही जोरदार स्वागत झाले आणि तो वाचकांच्या पसंतीस उतरला.बोलीभाषेतील आशय आणि शब्दशैली मुळे या काव्यसंग्रहास 'गदिमा पुरस्कार,पुणे', 'यशवंतराव पुरस्कार,पुणे',
'डॉ.न.ना.देशपांडे पुरस्कार,कोल्हापूर' या प्रतिष्टीत पुरस्कारां सोबतच अनेक इतर पुरस्कार मिळाले.

त्यांच्या काही कवितांचा चित्रपट क्षेत्रात 'गीत' म्हणून सहभागही झाला ज्यात 'चौर्य' या आगामी चित्रपटात 'पायरीला गेले तडे...' आणि 'घाटी' या चित्रपटात 'मर्द खरा शोभतो हा घाटी...' या गीत लेखनाचा सहभाग झाला आहे.

त्याचसोबत ग्रामीण भाषेतील दर्जेदार भाषा आणि शब्दशैलीचा सादरीकरण या माध्यमातून 'गाव झालंय व्हिलेज..' या माती आणि नाती जपणाऱ्या काव्यवाचन कार्यक्रम ते  संपूर्ण महाराष्ट्रात खेडोपाड्यात,गावोगावी,शहरात ते आणि त्यांचे सहकारी सादर करतात.

आजच्या ग्रामीण कृषी व्यवस्थेत काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबात जन्म घेऊन शिकलेल्या तरुणांनी 'माती आणि नाती' टिकवताना कवी विष्णू थोरे यांचा आदर्श घ्यावा.

ग्रामीण भागात कृषी व्यवस्थेचं रडगाणं करत बसण्यापेक्षा शिकलेल्या ज्ञानातून आणि आत्मसात केलेल्या विविध कलेतून ग्रामीण कृषी व्यवस्था संवर्धन,ग्रामीण संस्कृती जतन आणि शेतीविषयी प्रेम,आदर आणि जिव्हाळा अधिक घट्ट करावा कारण हीच काळाची गरज आहे असे मला वाटते...

शब्द संकलन-सचिन सुशील.

'एक दिवस,एक लेखक' क्रिएटिव्ह टीम.

Friday, 11 November 2016

प्रा.आशालता कांबळे (जेष्टय कवयत्री-लेखिका)

'एक दिवस,एक लेखक'     

नाव - प्रा.आशालता कांबळे

व्यवसाय - प्राध्यापिका

साहित्यिक परीचय - जेष्टय कवयत्री - लेखिका    


प्रा. आशालता कांबळे ह्या 1978 पासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत, तर 1980 पासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत 
         कोकणातल्या एका खेड्यात 'साने गुरुजी कथेमालेपासून' त्यांची सामाजिक क्षेत्रातील वाटचाल सुरु होऊन, आज त्या फुले-आंबेडकरी चळवळीतील एक तत्त्वनिष्ठ कार्यकर्त्या, परखड वक्तया
संविधान मूल्यांच साहित्य लिहिणाऱ्या लेखिका, कवयत्री, समिक्षिका म्हणून परिचित आहेत. गेली चाळीस वर्ष त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात हजाराच्यावर प्रबोधनात्मक व्याख्याने दिलेली आहेत. तसेच राज्यपातळीवरील आणि देशपातळीवरील अनेक परिषदांमध्ये सामाजिक विषयावरील शोधनिबंधाचे सादरीकरण केलेले आहे.
        त्यांनी अनेक पुस्तकांचं लेखन केलेलं असून 'बहिणाबाईंच्या कविता: एक आकलन' या पुस्तकास डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल पुरस्कार' तसेच कोकण मराठी साहीत्य परिषदेच्या समीक्षेसाठी दिला जाणारा प्रतिष्ठेचा 'प्रभाकर पाध्ये पुरस्कार' प्राप्त झालाय. याशिवाय 'यशोधरेची लेक' हा कवितासंग्रह,  'आमची आई', 'समर्थ स्त्रियांचा इतिहास' हि त्यांची विशेष गाजलेली पुस्तके. यातील काही पुस्तकांची महाराष्ट्र शासन ग्रंथ खरेदी योजनेसाठी निवड झालेली आहे. आणि नॅशनल ब्लाईंड आसोसिअश (नॅब) संस्थेमार्फत ध्वनीमुद्रिकेच्या स्वरूपात रूपांतर झालेली आहे. 'वामनदादा कर्डक पुरस्कार', 'सोनबा येलवे पुरस्कार', 'अप्पासाहेब रणपिसे पुरस्कार', असे अनेक पुरस्कार त्यांच्या पुस्तकांना प्राप्त झालेले आहेत. 'यशोधरेची लेक' मधील कवितांचा मुंबई विद्यापीठाच्या पादव्युत्तर अभ्यासक्रमासाठी समावेश झालेला आहे. तसेच यातील काही गीतांचा ध्वनीमुद्रिकेत समावेश झालेला आहे. थेरीगाथा, थेरीगाथा, यशोधरा, रमाई, जिजाऊ, यांच्यावरील व्याख्यानाच्या ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध झालेल्या आहेत. दूरदर्शन आकाशवाणीवरूनही त्यांची व्याख्याने तसेच मुलाखती प्रसिद्ध झालेल्या आहेत. इंटरनेटच्या 
'यू ट्यूब' संकेस्थळावर थेरिगाथांवरील व्याख्यान आणि 'आम्ही सूर्याच्या लेकी' या माहितीपटातील मुलाखतीचा समावेश आहे. बहिणाबाईंची कविता, सावित्रीबाई कविता, कुसुमाग्रजांची कविता या साहित्यिक विषयांवरही त्यांची आभ्यासपूर्ण व्याख्याने सत्तात्याने   होत आसतात
         दैनिक 'सम्राट' आणि दैनिक ' महानायक' मधून त्यांनी दीर्घकाळ स्तंभलेखन केलेले आहे. संविधान मूल्यांच्या साहित्याची मीमांसा ही समीक्षेतील संकल्पना घेऊन त्यांनी मराठीतील शंभर पुस्तकांची समीक्षा दोन वर्ष स्तंभलेखन करून वाचकांपर्यंत पोचवली. अनेक पुस्तकांच्या अभ्यासपूर्ण प्रस्तावना, ललितलेख, वैचारिक लेख, प्रासंगिक लेख, कथा, कविता असे विपुल लेखन त्यांनी केलेले आहे. त्यांच्या चळवळीतील कामासाठी त्यांना ' 'सावित्रीबाई फुले' फातिमा शेख पुरस्कार 'समाजभूषण पुरस्कार' ' 'कस्तुरी महिला भूषण पुरस्कार' आशा अनेक पुरस्कारांनी गौरविलेले आहे. आशिया खंडातील कर्तृत्वान व्यक्तिंचा परिचय करून देणाऱ्या ' हुज- हू' या दिल्लीतून प्रकाशित होणाऱ्या 2013 च्या अंकात लेखिका म्हणून त्यांच्या लेखनकर्तृत्वाची ओळख समाविष्ट करण्यात आलेली आहे.

संकलन - मोहसीन भालदार/स्नेहल कुलकर्णी

संकल्पना - सचिन सुशील

'एक दिवस,एक लेखक' क्रिएटिव्ह टीम.

Tuesday, 27 October 2015

श्री.दिलीप मालवणकर (कवी-लेखक)


एक दिवस,एक लेखक
श्री.दिलीप मालवणकर
(कवी-लेखक)


माझे महाविद्यालयीन शिक्षण श्रीमती चांदीबाई महाविद्यालयात झाले. मराठी वाड्:मय मंडळाच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात. मी आणि माझ्या सहकार्यांनी या मंडळाच्या वतीने 'पाथेय' नावाचे भिंतीपत्रक पाक्षिक स्वरुपात सुरु केले. त्यामुळे पत्रकार बनण्याच्या आधीच मी संपादक झालो. दरम्यान वयाच्या १९ व्या वर्षापासूनच माझे कवितालेखन,काव्यवाचन स्पर्धेत सहभाग,एकांकीकतून अभिनय आणि सामाजिक वाटचाल सुरु झाली होती.

याच दरम्यान एक प्रतिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशित करावा अशी माझ्या डोक्यात कल्पना आली.पण आर्थिक पाठबळ नव्हते नाही प्रकाशनाचा अनुभव होता.परंतु आशावाद दुर्दम्य आणि कायम होता. मग एक उपाय सुचला आणि 'अवघ्या १० रूपयांत काव्यसंग्रह' असे वर्तमानपत्रात जाहिर आवेदन दिले. हे आवेदन प्रसिद्ध होताच महाराष्ट्राच्या विविध भागांतून कविता आल्या.मीच स्वयंघोषित संपादक असल्याने १० उत्कृष्ट कवींच्या प्रत्येकी ५ कविता निवडल्या आणि 'कवडसे' या नावाने प्रा.अशोक बागवे,कविवर्य नरेंद्र बोडके,प्रा.रतनलाल सोनग्रा यांच्या उपस्थितीत सन १९८० मध्ये हा काव्यसंग्रह प्रकाशित केला.अश्या प्रकारे माझा पहिले संपादित पुस्तक प्रसिद्ध झाले.

माझ्या पत्रकारितेच्या करकिर्दीच्या आधीही मी विविध नियतकलिकांतून प्रामुख्याने 'दै.नवशक्ति','दै.सन्मित्र','दै.जनादेश', आदी वर्तमानपत्रातून तसेच 'अजब लोकशक्ति' च्या संपादकीय सदरातून 
विपुल लेखन केले.माझे सामाजिक, राजकीय,प्रबोधनात्मक,टिकात्मक,वैचारिक,विश्लेषणात्मक लेख त्यावेळी वाचकांच्या पसंतीस उतरले. आणि १९७५ पासून माझ्या लेखन प्रवासास प्रारंभ झाला. सुरवातीस 'सा.मार्मिक',
'दै.गावकरी','सा.पाचोळा','सा.मेरिट' या नियतकलिकांमध्ये लेखन केले.'दै.नवशक्ती' चे तत्कालीन संपादक पु.रा.बेहरे यांच्या प्रोत्साहनमुळे मी समृद्ध लिखाण करू शकलो. अनेक ज्वलंत विषयांवरील लेखांचे २-२,३-३ लेख प्रसिद्ध होत. १९८७ च्या निवडणुकीचे प्रभागनिहाय विश्लेषण व् अंदाज तब्बल दहा दिवस प्रसिद्ध झाले.

दरम्यान मी १९८१ साली कोकण भवन येथे सार्वजनिक बांधकाम विभागातील 'संकल्प चित्र मंडळा'त स्टेनोग्राफर म्हणून सेवेत रुजू झालो.शासकीय नोकरी आणि निर्भीड पत्रकारीता एकत्र करणे शक्य नव्हते.त्यानुसार 'नोकरी' की 'पत्रकारीता' यापैकी एकाची निवड करने मला क्रमप्राप्त होते. त्यातील पत्रकारीतेला प्रथम प्राधान्य देवून,कायमस्वरूपी उत्तम वेतन असलेली नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. नोकरी सोडली;परंतू कुटुंबाची जवाबदारी होतीच.तेव्हा उपजीविकेसाठी मी 'हेमांगी प्रिंटर्स' हा छपाईचा व्यवसाय सुरु केला.त्याच सोबत छंद जोपासन्यासाठी 'सा.अजब लोकशक्ती' हे साप्ताहिक (२ ऑक्टो.१९८७) पासून सुरु केले.१९८७-२०१२ पर्यंत 'सा.अजब लोकशक्ती' सन्मानाने चालवले. पत्रकारीतेमुळे नावलौकिक व् प्रतिष्ठा मिळाली.

१९९२ च्या नगरपालिका निवडणुकीत १४ इच्छुक उमेदवारांतून मला शिवसेनेची उमेदवारी मिळाली.
या सर्व गदारोळात माझी पत्रकारीता अव्याहतपणे सुरु होती. सोबतच 'अस्मिता ट्रस्ट' च्या माध्यमातून साहित्यिक,शैक्षणिक,कला,क्रीड़ा,समाजसेवा क्षेत्रात कार्यही सुरु होते आणि आजही आहे. या वाटचालित
माझ्या हातून जे लिखाण झाले त्या निवडक लेखांचा समावेश मी 'आपल् उल्हासनगर' या उल्हासनगरशी संबंधित संग्रहात केला आहे.आजचे वर्तमानपत्र उद्याची रद्दी ठरते पण त्यातील वाचनिय संग्राह्य लेख पुस्तक रूपाने प्रकाशित केले तर ते अक्षर - वाड:मय ठरेल.भावी पिढीसाठी ते एक ठेवा ठरावा.म्हणून मी माझा 'मालवणी मसाला' हा संग्रह प्रकाशित केला. या संग्रहातील लेख मराठीचे विद्यार्थी आणि नवोदित पत्रकार यांना नक्कीच मार्गदर्शक ठरेल,अशी अपेक्षा आहे...

-श्री.दिलीप मालवणकर (पत्रकार-लेखक-कवी)
==========================================================================

                     माझ्या आधीच्या राहत्या घरी, अगदी माझ्या लहान पनापासून न चुकता दर आठवद्याला पोस्टाने वडिलांच्या (सुशील चांदोरीकर,वरिष्ट पत्रकार) नावाने दोन साप्ताहिक अंक येत असत. त्यातील एक दिल्ली येथील.....तर दूसरा श्री.दिलीप मालवणकर काका यांचा 'सा.अजब लोकशक्ती' ! त्या वेळेत एवढं कळत नसायच तेव्हा फ़क्त त्या सप्ताहिकातील फ़ोटोज़ आणि कविता वाचायला आवडायच्या...आणि पुढे हळूहळू त्याद्वारे उल्हासनगर मधील शैक्षणिक,सामाजिक आणि राजकारण यांच्याशी संबंधित बातम्या नित्य नियमाने वाचनात येवु लागल्या. पोस्टमेन लांबुन येताना दिसला की मग त्याला आधी पेपर ची विचारपुस् मी करीत असत.

बऱ्याच वर्षापासून माझ्या वडिलांचे आणि त्यांचे घनिष्ट मैत्रीपूर्ण संबंध...काही काळ दोघनीही 'दै.नवशक्ति' मध्ये सोबत होते आणि कल्याण-उल्हासनगर-अंबरनाथ पत्रकार संघात एकत्र पत्रकारीता कार्य करत होते. माझी शाळा 'उल्हास विद्यालय' मध्ये काकांच्या अस्मिता ट्रस्ट तर्फे विविध उपक्रम आणि कार्यक्रम आयोजित व्हायचे. त्यात दरवर्षी अभ्यास मालिका,कविता वाचन,काव्य स्पर्धा,वकृत्व स्पर्धा घेतल्या जात असे.

सुट्टीच्या दिवशी वडिलांसोबत 'हेमांगी प्रिंटिंग' प्रेस वर माझही आवडीने येणे-जाणे व्हायच. तिथले प्रिंटिंग मशीन,ब्लॉक्स,काळी शाई,छापूण झालेले पत्रक, कोरे पेपर्स पाहुन फार कुहुतुल वाटत असे. त्याच सोबत तिथे दिलीप सरांची भेट होत असे. त्या काळापासून काका त्यांच्या राजकीय जीवनातही अत्यंत प्रभावी आणि लोकप्रिय व्यक्तिमत्व आहेत.नगरवासियांच्या समस्या,प्रश्न,सुखसुविधा ई. बाबित ते त्या काळात एक उत्कृष्ट नगरसेवक म्हणून भूमिका बजावली आणि आजही ते कोणत्याही पदाशिवाय अखंड पने सर्वांना सहकार्य करत आहे. 

आजही श्री दिलीप मालवणकर काका समाजहिताच्या आणि जनसमान्यांसाठी शैक्षणिक,सामाजिक,साहित्यिक योगदनातून अखंड उल्हासनगर शहरात विविधपूर्ण उपक्रम सतत राबवत असतात. नुकत्याच षष्टिपूर्तिच्या निमित्ताने त्यांनी आधाराश्रम वसतीगृह,त्र्यम्बकेश्वर या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना विविध स्वरुपात मदत केली आणि समाजातील या महत्वाच्या व्यक्ति घटकांविषयी आत्मीयता आणि जाणीव ठेवली. विशेष म्हणजे आजही ते त्यांच्या एवढ्या मोठ्या प्रपंचातून त्यांच्या 'कवितेला' आणि लिखानाला वेळ देतात आणि अतिशय सुंदर रचना काव्यातील अनेक प्रकारात (हायकू,चारोळी,शेरोशायरी,कविता) रूपाने लिहितात. 'उल्हासनगर' शहराबद्दल त्यांना कमालीची आत्मीयता आहे.

आज उल्हासनगर मध्ये मराठी साहित्यरुची जुन्या तसेच नविन पिढितिल विविध कलाकरांमध्ये आणि साहित्यप्रेमी जनतेमध्ये टिकवून रहावे यासाठी ते अविरत उपक्रम राबवतात आहे. त्यांचे आजही अखंड लिखाण सुरु आहे. आणि त्यांच्या निर्मित साहित्य लिखानाचा माझ्यासहित शहरातील सर्व जुन्या नविन पिढीला होत आला आहे आणि या पुढेही होइलच.

उल्हासनगर वर प्रेम करणाऱ्या आणि इथे राहणाऱ्या रहिवासियांनी आवर्जून घेवून वाचावित त्यांची 'आपल उल्हासनगर' आणि 'मालवणी मसाला' हे पुस्तक...आणि त्यांच्या आगामी कवितासंग्रहाची लवकरात लवकर आपल्या वाचनात येण्यासाठी आपण सारेच प्रतीक्षा करुयात...

त्यांच्या भावी साहित्यिक,सामाजिक,राजकीय वाटचाली साठी मनःपूर्वक शुभेच्छा...

- सचिन सुशील.