Tuesday, 27 October 2015

श्री.दिलीप मालवणकर (कवी-लेखक)


एक दिवस,एक लेखक
श्री.दिलीप मालवणकर
(कवी-लेखक)


माझे महाविद्यालयीन शिक्षण श्रीमती चांदीबाई महाविद्यालयात झाले. मराठी वाड्:मय मंडळाच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात. मी आणि माझ्या सहकार्यांनी या मंडळाच्या वतीने 'पाथेय' नावाचे भिंतीपत्रक पाक्षिक स्वरुपात सुरु केले. त्यामुळे पत्रकार बनण्याच्या आधीच मी संपादक झालो. दरम्यान वयाच्या १९ व्या वर्षापासूनच माझे कवितालेखन,काव्यवाचन स्पर्धेत सहभाग,एकांकीकतून अभिनय आणि सामाजिक वाटचाल सुरु झाली होती.

याच दरम्यान एक प्रतिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशित करावा अशी माझ्या डोक्यात कल्पना आली.पण आर्थिक पाठबळ नव्हते नाही प्रकाशनाचा अनुभव होता.परंतु आशावाद दुर्दम्य आणि कायम होता. मग एक उपाय सुचला आणि 'अवघ्या १० रूपयांत काव्यसंग्रह' असे वर्तमानपत्रात जाहिर आवेदन दिले. हे आवेदन प्रसिद्ध होताच महाराष्ट्राच्या विविध भागांतून कविता आल्या.मीच स्वयंघोषित संपादक असल्याने १० उत्कृष्ट कवींच्या प्रत्येकी ५ कविता निवडल्या आणि 'कवडसे' या नावाने प्रा.अशोक बागवे,कविवर्य नरेंद्र बोडके,प्रा.रतनलाल सोनग्रा यांच्या उपस्थितीत सन १९८० मध्ये हा काव्यसंग्रह प्रकाशित केला.अश्या प्रकारे माझा पहिले संपादित पुस्तक प्रसिद्ध झाले.

माझ्या पत्रकारितेच्या करकिर्दीच्या आधीही मी विविध नियतकलिकांतून प्रामुख्याने 'दै.नवशक्ति','दै.सन्मित्र','दै.जनादेश', आदी वर्तमानपत्रातून तसेच 'अजब लोकशक्ति' च्या संपादकीय सदरातून 
विपुल लेखन केले.माझे सामाजिक, राजकीय,प्रबोधनात्मक,टिकात्मक,वैचारिक,विश्लेषणात्मक लेख त्यावेळी वाचकांच्या पसंतीस उतरले. आणि १९७५ पासून माझ्या लेखन प्रवासास प्रारंभ झाला. सुरवातीस 'सा.मार्मिक',
'दै.गावकरी','सा.पाचोळा','सा.मेरिट' या नियतकलिकांमध्ये लेखन केले.'दै.नवशक्ती' चे तत्कालीन संपादक पु.रा.बेहरे यांच्या प्रोत्साहनमुळे मी समृद्ध लिखाण करू शकलो. अनेक ज्वलंत विषयांवरील लेखांचे २-२,३-३ लेख प्रसिद्ध होत. १९८७ च्या निवडणुकीचे प्रभागनिहाय विश्लेषण व् अंदाज तब्बल दहा दिवस प्रसिद्ध झाले.

दरम्यान मी १९८१ साली कोकण भवन येथे सार्वजनिक बांधकाम विभागातील 'संकल्प चित्र मंडळा'त स्टेनोग्राफर म्हणून सेवेत रुजू झालो.शासकीय नोकरी आणि निर्भीड पत्रकारीता एकत्र करणे शक्य नव्हते.त्यानुसार 'नोकरी' की 'पत्रकारीता' यापैकी एकाची निवड करने मला क्रमप्राप्त होते. त्यातील पत्रकारीतेला प्रथम प्राधान्य देवून,कायमस्वरूपी उत्तम वेतन असलेली नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. नोकरी सोडली;परंतू कुटुंबाची जवाबदारी होतीच.तेव्हा उपजीविकेसाठी मी 'हेमांगी प्रिंटर्स' हा छपाईचा व्यवसाय सुरु केला.त्याच सोबत छंद जोपासन्यासाठी 'सा.अजब लोकशक्ती' हे साप्ताहिक (२ ऑक्टो.१९८७) पासून सुरु केले.१९८७-२०१२ पर्यंत 'सा.अजब लोकशक्ती' सन्मानाने चालवले. पत्रकारीतेमुळे नावलौकिक व् प्रतिष्ठा मिळाली.

१९९२ च्या नगरपालिका निवडणुकीत १४ इच्छुक उमेदवारांतून मला शिवसेनेची उमेदवारी मिळाली.
या सर्व गदारोळात माझी पत्रकारीता अव्याहतपणे सुरु होती. सोबतच 'अस्मिता ट्रस्ट' च्या माध्यमातून साहित्यिक,शैक्षणिक,कला,क्रीड़ा,समाजसेवा क्षेत्रात कार्यही सुरु होते आणि आजही आहे. या वाटचालित
माझ्या हातून जे लिखाण झाले त्या निवडक लेखांचा समावेश मी 'आपल् उल्हासनगर' या उल्हासनगरशी संबंधित संग्रहात केला आहे.आजचे वर्तमानपत्र उद्याची रद्दी ठरते पण त्यातील वाचनिय संग्राह्य लेख पुस्तक रूपाने प्रकाशित केले तर ते अक्षर - वाड:मय ठरेल.भावी पिढीसाठी ते एक ठेवा ठरावा.म्हणून मी माझा 'मालवणी मसाला' हा संग्रह प्रकाशित केला. या संग्रहातील लेख मराठीचे विद्यार्थी आणि नवोदित पत्रकार यांना नक्कीच मार्गदर्शक ठरेल,अशी अपेक्षा आहे...

-श्री.दिलीप मालवणकर (पत्रकार-लेखक-कवी)
==========================================================================

                     माझ्या आधीच्या राहत्या घरी, अगदी माझ्या लहान पनापासून न चुकता दर आठवद्याला पोस्टाने वडिलांच्या (सुशील चांदोरीकर,वरिष्ट पत्रकार) नावाने दोन साप्ताहिक अंक येत असत. त्यातील एक दिल्ली येथील.....तर दूसरा श्री.दिलीप मालवणकर काका यांचा 'सा.अजब लोकशक्ती' ! त्या वेळेत एवढं कळत नसायच तेव्हा फ़क्त त्या सप्ताहिकातील फ़ोटोज़ आणि कविता वाचायला आवडायच्या...आणि पुढे हळूहळू त्याद्वारे उल्हासनगर मधील शैक्षणिक,सामाजिक आणि राजकारण यांच्याशी संबंधित बातम्या नित्य नियमाने वाचनात येवु लागल्या. पोस्टमेन लांबुन येताना दिसला की मग त्याला आधी पेपर ची विचारपुस् मी करीत असत.

बऱ्याच वर्षापासून माझ्या वडिलांचे आणि त्यांचे घनिष्ट मैत्रीपूर्ण संबंध...काही काळ दोघनीही 'दै.नवशक्ति' मध्ये सोबत होते आणि कल्याण-उल्हासनगर-अंबरनाथ पत्रकार संघात एकत्र पत्रकारीता कार्य करत होते. माझी शाळा 'उल्हास विद्यालय' मध्ये काकांच्या अस्मिता ट्रस्ट तर्फे विविध उपक्रम आणि कार्यक्रम आयोजित व्हायचे. त्यात दरवर्षी अभ्यास मालिका,कविता वाचन,काव्य स्पर्धा,वकृत्व स्पर्धा घेतल्या जात असे.

सुट्टीच्या दिवशी वडिलांसोबत 'हेमांगी प्रिंटिंग' प्रेस वर माझही आवडीने येणे-जाणे व्हायच. तिथले प्रिंटिंग मशीन,ब्लॉक्स,काळी शाई,छापूण झालेले पत्रक, कोरे पेपर्स पाहुन फार कुहुतुल वाटत असे. त्याच सोबत तिथे दिलीप सरांची भेट होत असे. त्या काळापासून काका त्यांच्या राजकीय जीवनातही अत्यंत प्रभावी आणि लोकप्रिय व्यक्तिमत्व आहेत.नगरवासियांच्या समस्या,प्रश्न,सुखसुविधा ई. बाबित ते त्या काळात एक उत्कृष्ट नगरसेवक म्हणून भूमिका बजावली आणि आजही ते कोणत्याही पदाशिवाय अखंड पने सर्वांना सहकार्य करत आहे. 

आजही श्री दिलीप मालवणकर काका समाजहिताच्या आणि जनसमान्यांसाठी शैक्षणिक,सामाजिक,साहित्यिक योगदनातून अखंड उल्हासनगर शहरात विविधपूर्ण उपक्रम सतत राबवत असतात. नुकत्याच षष्टिपूर्तिच्या निमित्ताने त्यांनी आधाराश्रम वसतीगृह,त्र्यम्बकेश्वर या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना विविध स्वरुपात मदत केली आणि समाजातील या महत्वाच्या व्यक्ति घटकांविषयी आत्मीयता आणि जाणीव ठेवली. विशेष म्हणजे आजही ते त्यांच्या एवढ्या मोठ्या प्रपंचातून त्यांच्या 'कवितेला' आणि लिखानाला वेळ देतात आणि अतिशय सुंदर रचना काव्यातील अनेक प्रकारात (हायकू,चारोळी,शेरोशायरी,कविता) रूपाने लिहितात. 'उल्हासनगर' शहराबद्दल त्यांना कमालीची आत्मीयता आहे.

आज उल्हासनगर मध्ये मराठी साहित्यरुची जुन्या तसेच नविन पिढितिल विविध कलाकरांमध्ये आणि साहित्यप्रेमी जनतेमध्ये टिकवून रहावे यासाठी ते अविरत उपक्रम राबवतात आहे. त्यांचे आजही अखंड लिखाण सुरु आहे. आणि त्यांच्या निर्मित साहित्य लिखानाचा माझ्यासहित शहरातील सर्व जुन्या नविन पिढीला होत आला आहे आणि या पुढेही होइलच.

उल्हासनगर वर प्रेम करणाऱ्या आणि इथे राहणाऱ्या रहिवासियांनी आवर्जून घेवून वाचावित त्यांची 'आपल उल्हासनगर' आणि 'मालवणी मसाला' हे पुस्तक...आणि त्यांच्या आगामी कवितासंग्रहाची लवकरात लवकर आपल्या वाचनात येण्यासाठी आपण सारेच प्रतीक्षा करुयात...

त्यांच्या भावी साहित्यिक,सामाजिक,राजकीय वाटचाली साठी मनःपूर्वक शुभेच्छा...

- सचिन सुशील.




Friday, 23 October 2015

आयु.शुक्राचार्य गायकवाड़ (ज्येष्ट कवी)

एक दिवस,एक लेखक

आयु.शुक्राचार्य गायकवाड़
(ज्येष्ट कवी)


व्यवसाय : प्राध्यापक म्हणून महाविद्यालयीन सेवानिवृत्ति

'प्रतिमा,कल्पना,भावना, विद्रोह आणि वेदना तसेच शब्दांचा साठा असला की,कवितेच्या वाटा सहजपणे निर्माण होतात.या वाटेने कवी जावु लागला की उत्स्फूर्त कवितेचा जन्म होतो' ही माझ्या कवितेची व्याख्या....
वरील व्याख्या आतून येण्यासाठी मला ४२ वर्षे लागली. आणि समाधान वाटले.
कविता माझा लहानपना पासूनच आवडीचा विषय...माझा पहिला कविता संग्रह निघाला तो म्हणजे 'निंबार'. निंबार म्हणजे रखरखित दुपारचे 'उन'.  हा कविता संग्रह खुप गाजला. संग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेले कविवर्य कुसुमाग्रज यांचा आशीर्वाद लाभला.विचारवंत आणि समीक्षक प्रा.केशव मेश्राम यांची प्रस्तावना लाभली आणि प्रकाशन कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या हस्ते झाली. त्यानंतर माझी १६ काव्यसंग्रह प्रकाशित झाली. पण त्याआधी 'समानता' (१९८२) नावाची एकांकिका लिहिली त्याला पुण्यात प्रथम क्रमांक मिळाला आणि इतर पारितोषक देखील मिळाली.
काव्याचे विविध प्रकार मी लिहले आहेत. आकाशवाणी व् दूरदर्शन वर अनेकवेळा विविध काव्य कार्यक्रम सादर केलेले आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराच्या एकांकिका,अभिनय एकपात्री नाट्यछटाही लिहिल्या. मुलांसाठी डॉ.बाबासाहेबांच्या जीवनावरील पुस्तकेही मराठी,हिंदी,इंग्रजी भाषेत लिहिले आहेत.
त्याचसोबत मुलांसाठी बरीचसी बालगीते,भीमगीते आणि धम्मगीते ही लिहली. ती गीते सुप्रसिद्ध गायक-संगीतकार दत्ताजी जाधव,संगीतकार प्रा.श्याम क्षीरसागर, कुमारी गाथा जाधव,गंधार जाधव,शीतल खांडेकर,लक्ष्मीताई बोरकर,इंदुताई बोरकर अश्या अनेक गायकांनी गायली. विशेष म्हणजे प्रल्हादजी शिंदे यांनी माझी गीते गायली आहेत.
भविष्यात माझ्या गावच्या भाषेतील 'ब बला काना बा' हे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
रसिकांनी माझ्यावर भरभरुन प्रेम केले हे माझे समाधान आणि हीच माझी खरी कमाई आहे असे मी मानतो...
- शुक्राचार्य गायकवाड़ (डोंबिवली)
========================================================================
 माझा सरांशी परिचय अत्यंत लांबुन राहिला असला तरी माझ्या घरातील त्यांच्या विविध कविता संग्रहातून त्यांच्या प्रत्येक कविता खुप भावल्या आहेत. त्यांचे कायम वाचन राहिले आहे.कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक कार्यक्रमात आमची औपचारिक भेटी होतात.पण सरांच्या विचारातूनच जाणीवसमृद्ध भावनासापेक्ष अनुभव पाहायला आणि वाचायला मिळतो नेहमीच...कविते विषयी ते सांगतात....

"माझी कविता माझ्या माणसांशी बोलत राहते
आपल्या मातीशी इमान राखून राहते माझी कविता"

त्याचवेळी समाजातील दुःख ते अश्या ओळीतून माडतात की...

"पाऊस येण्यापूर्वी सर्वांचाच नजरा आभाळाकडे असतात पण,
झोपड़ीतल्या नजरा मात्र लागून असतात फाटलेल्या छपराकडे....
तेथील मूल गाणे गातच नाहीत
"येरे येरे पावसा तुला देतो पैसा...पैसा झाला मोठा,पाऊस आला मोठा..."
तिथले मुले गातात....
"ये ग ये भाकरी,मला दे चाकरी....चाकरी आली धावून....घरात पाऊस पड़ताच,भाकरी गेली वाहून...."

तसेच रोजमर्रा जीवनातील बेकारी बघुन त्यांनी 'व्यथा' मांडली की....

"आम्ही या भारत देशाचे,देशात स्थान नाही
दुसऱ्यास मिळे दाम,आम्हास काम नाही..."
आयुष्यातील प्रत्येक क्षणाची जाणीव राखताना त्यांनी लिहिले आहे की....
"जाणीव नाही क्षणाची,जुनेच पान वाचते
लागल्यात ठोकरा,जुनीच वाट चालते....."
(क्रमशः)

वरील सर्व कविता शुक्राचार्य सरांच्या 'या निळ्या नभाखाली...' या काव्यसंग्रहातील आहेत.
माणसातील माणूसपन कवितेच्या अर्थबोध शब्दांतून अतिशय संवेदनशील पने काळजला हात घालून प्रत्येक कवीची कविता रचना निर्माण होत असते...असे मला वाटते कायमच !
आपल्या लेखनीतून सदैव शांतीभावना आणि मंगलकामना जपणाऱ्या या ज्येष्ट कविवर्य शुक्राचार्य गायकवाड़ सरांना पुढील वाटचाली साठी मनःपूर्वक शुभेच्छा....

-सचिन सुशील.




Tuesday, 20 October 2015

हिरा गुलाबराव बनसोडे (कवयत्री)

एक दिवस,एक लेखक


हिरा गुलाबराव बनसोडे (कवयत्री)

सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारिका,
मुंबई

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील गराडे या खेड़ेगावी माझा जन्म झाला. वडील म्युन्सिपार्टित मेंशन म्हणून काम करायचे. शिक्षणही म्युन्सिपार्टीच्या शाळेत झाले. माझ्या जन्माच्या वेळेस घरी साखर वाटली नाही की नावाच्या घुगरया वाटल्या की नाही हे मला माहीत नाही कारण मी मुलगी झाली हे वडलांना कळवल तेव्हा त्यांनी पत्रच फाडून टाकली.तिथुनच स्त्रीच्या बाईपनाची वेदना वाट्याला आली.
नववित असताना लग्न झाले आणि संसाराचा गाडा माझ्या कोवळया खांद्यांवर पडला.शिकायला परवानगी नव्हती पण काट्यांसोबत फुलही फुलतात त्याप्रमाणे पुढे माझ्या सासऱ्यांनी व् यजमानांनी मला शिक्षणास परवानगी दिली. प्राइवेट क्लास जॉइन करुन मी १९६२ ला 'एस एस सी' पास झाले.
१९६५ साली मला रेल्वेत नोकरी लागली. रेल्वेत असतानाच मी कविता करू लागले.लहानपना पासूनच गायची आवड होती. आणि मग कंठात गाणे आणि लेखनित कविता अशी माझी आणि कवितेची गळाभेट झाली.माझ्या श्वासात कविता कायम रुतून राहिली.कविता माझ्यात कधी विरघळली हे कळलच नाही.त्यानंतर माझ्या कविता मासिकांतून,
वर्तमानपत्रातून प्रसिद्ध होवू लागल्या. आकाशवाणी,दूरदर्शन आणि इतर काव्यसंमेलनात माझ्या कवितेचा सहभाग असायचा. माझ्या 'फिर्याद' या कविता संग्रहाचा मराठवाड़ा विद्यापीठातील बी ऐ च्या अभ्यासक्रमात सहभाग झाला.या वर्षापासून 'फिर्याद' कविता संग्रह एम् ऐ च्या अभ्यासक्रमात् आहे.
माझा पहिला काव्यसंग्रह 'पोर्णिमा' १९६९ साली प्रसिद्ध झाला. त्यात प्रेम,निसर्ग,वर्णन होती.पोर्णिमेची चांदण पानापानात झिरपायची.काव्यफुलांचा बहार असायचा.ती नजाकत अलगच असायची...मी त्यात रमून जायची.
पण समाजात दलित स्त्रियांवर होणारे अत्याचार,त्यांची विटम्बना,सवर्णानि केलेले बलात्कार,त्यांच्या त्या करुण किंकाळ्यांनी काळजाला आग लागली होती.आणि माझ्या कवितेने कुस बदलली.आता माझी कविता वयात आली होती.माझी कविता वयात आली होती.
त्यातूनच माझा 'फिर्याद' काव्यसंग्रह जन्मास आला त्यात मी स्त्रियांच्या व्यथा,वेदना,तरफड आणि जखमा समाजापुढे मांडल्या.त्यातल्या कविता स्त्रियांना आपल्या वाटल्या.'फिर्याद' हा काव्यसंग्रह खुप गाजला.त्यातील कवितांचे हिंदी,इंग्रजी,उर्दू,कन्नड़,गुजराती भाषेत भाषांतर झाली.
आत्तापर्यंत माझे 'पोर्णिमा','फिर्याद' आणि 'फिनिक्स' असे तीन काव्यसंग्रह प्रकाशित झाले आणि वाचकांच्या पसंतीस मनमुराद उतरले आहेत. लवकरच 'फ़क्त तुझ्यासाठी' हा काव्यसंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे.

- 'फीनिक्स' ला महाराष्ट्र राज्याचा 'कुसुमाग्रज' पुरस्कार (२००१-२००२)
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मिशन,कैनेडा पुरस्कार (२००२)
- अस्मितादर्शन चा 'अहिल्याबाई होळकर' पुरस्कार
- दया पवार पुरस्कार (२००८-२००९)
- कर्मवीर दादासाहेब पुरस्कार (२००२)
- संबोधि प्रतिष्ठान पुरस्कार (२००८)
आणि इतर अनेक महत्वाचे पुरस्कार.

माझ्या रेल्वेच्या सेवेत मी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आणि कविसंमेलनात भाग घेत असे.विशेष महत्वाचे म्हणजे त्या काळात आयु.सुशील पगारे (चांदोरीकर) हे 'रेलप्रभा' साहित्य मंडळामार्फ़त 'रेलप्रभा' हे मासिक काढयचे त्यात ओढिने आणि आत्मियतेने माझ्या कवितेचा सहभाग असायचा...अजूनही हे एकमेव साहित्यिक मासिक सुरु आहे रेल्वेत.त्यांनी या मासिकासाठी फार कष्ट घेतले. त्याबद्दल त्यांचा अभिमान वाटतो.
परंतू,रेल्वेने आमच्या सारख्या सहित्यिकांना कधीच खेळाडूंसारखी वागणूक आणि प्रोत्साहन दिले नाही याची खंत वाटते कायमच !
माझ्या साहित्यिक प्रवासात माझ्या पतींनी मला नेहमीच सहाय्य केले माझ्या कवितेचे सर्व श्रेय त्यांचेच आहे.
जीवाच्या कळा जीवालाच कळतात आणि तेच माझ्या जीवलगांनी माझ्यासाठी केले.
- हिराताई गुलाबराव बनसोडे.
==========================================================================
ज्येष्ट कवयत्री हिराताई बनसोडे या माझ्या कौटुंबिक रुणानुबंधातील अत्यंत जवळच्या नात्यातून आत्त्या लागतात.
आज मला त्यांच्यावर लेख लिहायाला मिळाला हे माझ सौभाग्य आहे.रेल्वेतील सांस्कृतिक कार्यक्रमात लहानपनापासूनच माझ जाण येणे आणि सहभाग असायचा. त्यातच लहान वयात घरात 'रेलप्रभा' मसिकांचे दर महिन्यांचे अंक घरात असायचे. आणि प्रत्येक अंकात हीराताईंची कविता असायची. त्या काळात कविता समजत नसायच्या पण त्यातील शब्द आकर्षित करायचे आणि मग त्या संग्रही रहायच्या...
जेव्हा कळायला लागले.वाचनाची आणि लिखानाची गोडी लागली आणि कविता अंतरंगात सजायला लागली तेव्हा याच संग्रहातील कवितांनी साहित्याशी ओळख निर्माण करुन दिली. 'फेमिनिन पोएट्री' चा अर्थ त्या वयात हिरा आत्यांच्या कविता वाचून कळाला होता.
आजही त्यांच्या जुन्या कवितांचे संग्रह घरात कायम आहेत.त्यांचे स्थान माझ्या निवडक पुस्तकात आवडतीचे आहे. आजच्या समृद्ध जीवन संपन्न स्त्रियांच्या कविता आणि त्या काळातील हिरा आत्यांसारख्या शोषित आणि पीड़ित परिस्थितीत घडलेल्या प्रतिभाशाली कवयत्रिंमध्ये बरीच तफावत आढळते. हा पण स्वरुप 'फेमिनिन' असते हे मानन्यात काही गैर नाही.
हिराआत्या आणि त्या काळच्या कवींनी सहित्यिकांनी तो काळ गाजवला आणि आपले साहित्य न केवळ निर्माण केले-रचले तर त्याला प्रभावीपने जनमाणसात मांडले आणि अजूनही जिवंत ठेवले आहे.
कविवर्य ग्रेस यांच्या 'Physical form of Poetry' या वाक्याप्रमाने या कवियत्रीने आजही कविता आपल्या आत अजूनही जिवंत ठेवली आहे.
माझ्यामते, 'Feminine poetry is a constructive build up of saturated woman words in her solicited world' या प्रत्ययातूनच एका खऱ्या कवयत्रीचे निर्मितिक्षेत्र उदयास येते आणि त्यातूनच तीला निर्मितीचा साक्षात्कार होत असतो. आणि त्यातूनच तिच्यातली कविता जन्म किंवा मरण पावते...
खऱ्या अर्थाने मला स्त्रीवादी कविता आजही फक्त आणि फ़क्त हिरा बनसोडे आत्यांच्या कवितेत समजते.
माझ्या वडिलांच्या सोबत मलाही हिरताईंच्या सानिध्यात बालपण ते आजतगायत त्यांच्या सानिध्यात राहता आले याचा अभिमान आणि आनंद वाटतो मला. बऱ्याच वेळा आम्ही आजही भेटून अनेक विषयांवर साहित्यावर चर्चा करतो. आज पर्यंत हिरा आत्यांनी मला माझ्या 'ग्रेस फेस्टिवल २०१४,मुंबई' या सारख्या कविवर्य 'ग्रेस' यांच्या साहित्यावर आधारित संकल्पना निर्मितीमध्ये आणि माझ्या प्रत्येक नवनिर्मितीच्या प्रक्रियेत अतिशय महत्वाच् आणि मोलाच मार्गदर्शन केल आहे.
बरच काही लिहिन्यासारख आणि सांगन्यासारख आहे हिरा बनसोडे आत्यंविषयी...पण लवकरच भविष्यातील माझ्या काही निर्मिती प्रकल्पात त्यांच्या विषयी इतर माध्यमांतून आपल्या समोर मांडेलच...
सचिन सुशील.


Monday, 19 October 2015

मेहता,चंद्रवदन चीमनलाल

एक दिवस,एक लेखक


मेहता,चंद्रवदन चीमनलाल
(६ एप्रिल १९०१–१९९२).


प्रख्यात गुजराती नट, नाटककार तसेच कवी, निबंधकार आणि समीक्षक.

जन्म सुरत येथे. मुंबई विद्यापीठातून ते बी.ए. झाले.काही काळ नवजीवनचे संपादकही होते. १९३८ ते ५४ ह्या काळात ते ‘आकाशवाणी’वर नोकरीस होते आणि अहमदाबाद केंद्राचे प्रमुख म्हणून ते निवृत्त झाले. १९६७ मध्ये त्यांना भारत सरकारने ‘पद्मश्री’देऊन गौरविले. १९७२ मध्ये त्यांना नाट्यलेखनासाठी संगीत नाटक अकादेमीचा पुरस्कार प्राप्त झाला. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नाट्य परिषदांना ते तज्ञ प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले. बडोदा येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठात तसेच अहमदाबाद येथील गांधी विद्यापीठात नाट्यविद्येचे अभ्यागत प्राध्यापक म्हणून ते काम करत होते.
चंद्रवदन मेहतांचे वडील बडोद्यास रेल्वेमध्ये नाकरीस असल्याने त्यांचा रेल्वेशी व तेथे काम करणाऱ्या माणसांशी प्रदीर्घ काळ व जवळून संबंध आला. यातूनच त्यांचे सर्वोत्कृष्ठ शोकात्म नाटक 'आगगाडी' (१९३७) उतरले. रेल्वेत काम करणाऱ्या व्यक्तींच्या जीवनाची त्यांना असलेली इत्यंभूत माहिती व त्यांच्याशी असलेले सहानुभूतिपूर्ण जवळिकीचे संबंध यांचे पुरेपूर प्रत्यंतर या नाटकांतून येते.
मेहता १९२५ च्या सुमारास मुंबईत शिकत असताना नाटकांची खूपच चलती होती; तथापि नाटकांतील स्त्रियांच्या भूमिका पुरुष करायचे. चंद्रवदन मेहतांनी गुजराती रंगभूमीला दिलेली अतिशय मोलाची देणगी म्हणजे त्यांनी त्याकाळी सर्वांत आधी नाटकातील स्त्रियांच्या भूमिका स्त्रियांनीच करण्याचा पायंडा पाडला. मेहता केवळ चांगले नाटककारच नव्हते, तर ते अभिनयकुशल श्रेष्ठ नटही होते. त्यांनी लिहिलेल्या अनेक नाटकांत त्यांनी स्वतः उत्कृष्ट भूमिका केल्या आणि त्या आजही अनेकांच्या चांगल्या स्मरणात आहेत. त्यांच्या नाटकांत आशयाचे नावीन्य, जिवंत व चमकदार संवाद व विनोद हे गुणविशेष प्रकर्षाने आढळतात.
त्यांनी कविता, निबंध, आत्मचरित्रपर लेखन, समीक्षा इ. प्रकारांत विपुल लेखन केले असले, तरी गुजराती साहित्यात ते एक श्रेष्ठ नाटककार व आत्मचरित्रपर लेखनाचे उत्कृष्ट गद्यशैलीकार म्हणूनच विशेष प्रसिद्ध आहेत.
नाटक व रंगभूमी हे गेली अनेक वर्षे त्यांच्या मोठ्या आस्थेचे व भावबंधाशी निगडीत असलेले विषय राहिले आहेत. लोकांमध्ये चांगली नाट्यभिरूची निर्माण व्हावी म्हणून तसेच आपल्या सुरत विभागात खरीखुरी दर्जेदार रंगभूमी प्रस्थापित व्हावी म्हणून त्यांनी आटोकाट प्रयत्न केले.
त्यांची अतिशय गाजलेली नाटके अशी :
'नागाबाबा' (१९३०),'आगगाडी' (१९३७), 'हो-होलिका', 'प्रे मनुं मोती अने बीजां नाटको' (१९३७), 'संताकुकडी' (१९३७), 'धारा सका नर्मद' (१९३७), 'मूंगी स्त्री' (१९३७), 'धरा गुर्जरी' (१९४४),'पांजरापोळ' (१९४७), 'रंगभंडार अने बीजा नाटको' (१९५३),इत्यादी. त्यांनी श्रेष्ठ गुजराती कवी अखो भगत व नर्मद यांच्या रंगभूमीची सुरुवात करून ती गुजराती जनतेपर्यंत नेऊन पोहोचविली. त्यांची नाटके सामाजिक, ऐतिहासिक,पौराणिक, चारित्रात्मक, प्रहसनात्मक इ. प्रकारांत आहेत. चंद्रवदन मेहता आणि के. एम्. मुनशी यांनी त्याकाळी मृतप्राय झालेल्या व्यावसायिक व पारंपरिक रंगभूमाला शेवटचा धक्का देऊन तिला कायमची मूठमाती दिली आणि नव्या आधुनिक रंगभूमीचे गुजरातीत प्रवर्तन केले. मेहतांनी काही गाजलेल्या यूरोपियन नाटकांचे गुजरातीत अनुवादही केले आहेत.
त्यांनी लिहिलेल्या कवितांचा 'इलाकाव्यो' (१९३३) हा संग्रह असून त्यात त्यांच्या स्कुट कविता आहेत, तर 'रतन' (तिसरी आवृ.१९३९) हे त्यांचे दीर्घकाव्य आहे. यातील अनेक कवितांत बहिण-भावातील निरागस, विशुद्ध प्रेम हा विषय आलेला असून ह्या कवितांना त्यांचा असा खास गोडवाही आहे. 'यमल' (१९२६) मध्ये त्यांनी पृथ्वी वृत्तात रचलेली १४ सुनीते असून ती अतिशय सुंदर उतरली आहेत.
मेहतांची नाटकाइतकीच महत्त्वपूर्ण साहित्यनिर्मिती म्हणजे त्यांच्या आत्मचरित्रपर लेखनाचे तीन खंड होत. 'बांध गठरियां', 'छोड गठरियां', 'रंगगठरियां' (३ भागांत १९५४).
'नाट्यगठरियां' (१९७०) हा त्यांचा दर्जेदार समीक्षापर ग्रंथ. ह्या खंडांमध्ये त्यांच्या प्रसन्न, स्वतंत्र व उत्कृष्ट अशा गद्यशैलीचे दर्शन घडते. ह्या गद्यलेखनातील त्यांची खास व स्वतंत्र शैली वाचकांस नेहमीच आकृष्ट करत आली आहे. गुजराती गद्याचे एक असामान्य शिल्पकार म्हणून त्यांचे स्थान फार वरचे आहे. त्यांनी काही लघुकथाही लिहिल्या आहेत; तथापि त्यात ते यशस्वी झाले नाहीत. वयाच्या ८५ व्या वर्षीही ते अतिशय कार्यक्षम आहेत. एक प्रसन्न व पट्टीचे वक्ते म्हणूनही त्यांचा लौकिक आहे.
त्यांच्या मौलिक साहित्यसेवेचा गौरव गुजराती रसिकांनी त्यांना १९७८ मध्ये ‘गुजराती साहित्य परिषदे’ चे अध्यक्ष म्हणून निवडून देऊन केला. १९७१ मध्ये त्यांच्यानाट्यगठरियांस साहित्य अकादेमी पुरस्कार मिळाला. १९३६ मध्ये गुजरातीतील सर्वोच्च असा ‘रणजितराम सुवर्णचंद्रक’ ही त्यांना मिळाला.
‪#‎माहिती‬ ‪#‎सौजन्य‬ : Copyright © 2015. सर्व हक्क मराठी विश्वकोश कार्यालयाकडे राखीव. संकेतस्थळ निर्मीती, सीडॅक जिस्ट, पुणे यांच्यामार्फत करण्यात आली.
=========================================================================
माझ्या रेल्वे माहितीपट या मोहिमेतील उम्मेदीच्या काळात चंद्रवदन मेहता याचं 'आगगाडी' हे पुस्तक वाचण्यासाठी हातात आले. आणि रेल्वेची जुनी संस्कृती माझ्या मनात खोलवर उतरली.
खरतर माझ्या घरात वडिलोपार्जित पिढ्यांपासून आजोबा,काका,वडील या तीन पिढ्या रेल्वेसेवा करत आल्या आहेत.
गैंगमेन या विषयला जेव्हा मी माझे शोधकार्य सुरु केले तेव्हा सर्वात महत्वाचे होते की मी प्रत्यक्षात लाइन मध्ये जावून या कर्मचारी आणि त्यांच्या कार्यासंदर्भात माहिती मिळवणे. आणि त्यात माझ्या वडिलांच् एक वाक्य ' गैंगमेन बघायचा आणि समजायचा तर घरात किंवा ऎ/सी ऑफिस केबिन मध्ये बसून त्याची माहिती नाही मिळणार त्यासाठी बाहेर पडावेच लागेल' या प्रमाने दर शनिवार-रविवार सुट्टीच्या काळात खंडळा-लोणावळा,कसारा-इगतपुरी,भुसावल,मनमाड ई. ठिकाणी दौरे सुरु केले. आणि दरम्यान अनेक जुन्या रेल्वेतील जीवनशैली आणि वास्तव्य असलेले लोक,घर,बंगले,आणि ऑफिस पाहण्यात आले.सोबतच जुन्या काळातील डब्लू सी एम् 5,डब्लू सी एम 4, डब्लू सी ऐ ऍम 2, या जुन्या इंजिन मध्ये जाण्या येण्याचा आणि जवळून पहन्याचा योग आला होता, आईचे वडील बी आय (ब्रिज इंस्पेक्टर) व् घाट ड्राईवर होते. त्यामुळे लहान पनापासूनच अस्सल रेल्वे कुटुंबाच्या संस्कारात् राहनिमाण झाले. आणि आजोबा आणि वडिलांकडून जुन्या जमान्यातील पासूनच रेल्वे जीवण ऐकत आलो होतो. ब्रिटिश काळापासून सुरु झालेले रेल्वे जीवन 'ब्रिटिश पायलट' या सारख्या उच्च कैटगरी मधून स्वतंत्रकाळा नंतरहि बऱ्याच वर्ष कायम राहिली.
पण त्या काळातील रेल्वे प्रणाली आणि त्यातील कर्मचारी यांच्या विषयी नेहमीच आतुरता आणि आवड राहिली होती...परंतु तो काळ पाहता आणि अनुभवता आला नाही ही मनात कुठेतरी खंत होती...
परंतु, चंद्रवदन मेहता यांच्या या पुस्तकाने त्यातील एकांकीकेच्या रूपाने अनेक पात्रांशी नव्याने ओळख आणि माहिती मिळाली.
रेल्वेतील कॉलबॉय,डरावरखाना,टनटेबल,कोपरेटी या सारख्या शब्दांचा आणि पदांचा आणि त्यांच्या कामाचा अर्थ समजला. आणि रेल्वे सारख्या प्रदीर्घ विषयावर काम करणे सहज सोपे झाले.
हे सर्व श्रेय केवळ चंद्रवदन मेहता यांच्या 'आगगाडी' या पुस्तकालाच...
सुशील.




चंद्रशेखर कुलकर्णी (लेखक)

एक दिवस एक लेखक

चंद्रशेखर कुलकर्णी (लेखक)

राहणार : ठाणे

विद्यापीठाची कला शाखेची पदवी घेतल्यानंतर जीवनात काही तरी करुन दाखवन्याची जिद्द होती...पण अंधत्वामुळे आलेल्या मर्यादा स्वीकारुन मध्य रेल्वेत टेलीफोन ऑपरेटरची नोकरी स्वीकारली.
साहित्याची आवड लहानपनपासूनच होती.रुईया कॉलेज मध्ये शिकताना प्रा.वसंत बापट,प्रा.पुष्पा भावे आणि प्रा.सदानंद रेगे यांनीसाहित्याची गोडी अधिक वाघवली. त्या काळात अंधासाठी झालेल्या अनेक वकृत्व स्पर्धेमध्ये ऑन दी स्पॉट विषय सूचवायचे यात नेहमीच प्रथम-द्वितीय क्रमांक मिळायचा.
रेल्वेसेवेत होणाऱ्या हिंदी वकृत्व मध्ये प्रथम क्रमांक मिळायचा. त्यातच बाळ कांदळकर,एस आर पगारे,हेमंत वट्टमवार,जयंत कुटुंबे,सुरेश करमरकर आणि श्री.दिघे यांच्यासारख्या अनेक साहित्यिक मित्रांचा सहभाग लाभला.मध्य रेल साहित्यिक मंडळाच्या कार्यक्रमात आणि अंकुरवेल या नियमित कलिकाच्या निर्मितीत आणि प्रसिद्धित हिरारीने सहभाग घेतला...
जन्मापासून अंधत्वाशी संघर्ष करत असताना चिंतनाची आणि स्वसंवादाची एक चांगली सवय लागली. चर्चेतील माझे विचार लोकांना आवडू लागले त्यांच्या नित्य जीवनात उपयोगी पडू लागले.
श्री.बाळ कांदळकरानी असे विचार लिहून ठेवन्यास आग्रह केला आणि त्यातूनच माझ लिखाण सुरु झाले.
'नितांत' या दिवाळी अंकातून सतत ९ वर्ष लेख लिहित राहिलो.
'क्रिकेट व् जीवनाचे तत्वज्ञान','पॉझिटिव राहणे म्हणजे काय ?', 'धर्माचे बदलते रूप' या सारख्या गंभीर विषयावर लेख लिहिले.
आकाशवाणी मुंबई केंद्राच्या प्रसारीत होणाऱ्या अस्मिता वाहिनीच्या 'ऐशी अक्षरे रसिके' या सदराखाली बरच लिखाण केले...
'गनुमामा','धर्मेआजी' या सारखी व्यक्तिचित्रे लिखनातून साकारली आणि वाचकांच्या मनात जागृत ठेवली.'धन्यवाद' व् 'अनुकूल' सारखे चिंतनपर लेख तसेच 'हिमालयाची ओढ़','सेराभाव' प्रवास वर्णनात्मक तसेच अंधांसाठी सामाजिक विषयांवरही बरेच लिखाण केले.
अंधांसाठी खेळल्या जाणाऱ्या विशेष क्रिकेटमध्ये प्रथम मुंबई कप साठी संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली.पंडित राजाराम शुक्ला आणि श्री.तेलवणे यांच्या मार्गदर्शनाखाली २०-२५ वर्षे तबला शिकलो आणि अनकवेळा त्यांच्या शास्त्रीय गायनाला साथ केली... अनेक निसर्गसहली,पावसाळी सहल,डोंगरकिल्ले यांच्या भटकंतीचा मनमुराद आनंद घेतला.
कोणत्याही वयातील व्यक्तिसोबत माणसाची मैत्री जुळते.निसर्ग हेच परमेश्वराचे रूप आहे.माणूस निसर्गाचाच एक भाग आहे.मानवता हाच खरा धर्म आहे असे साधे तत्त्वज्ञन आयुष्यभर जपले. लवकरच 'नितांत'प्रकाशन निर्मित माझे आत्मचरित्र लिहून पूर्ण होत आहे...आशा करतो त्यातील माझे विचार आपल्या पसंतीस पडतील...

- श्री.चंद्रशेखर शंकरराव कुलकर्णी
==========================================================================

तस पाहता श्री.कुलकर्णी काकांचा आणि माझ्या प्रत्यक्ष भेटीचा योग अजुन आला नाही.
काही अपवाद प्रसंग माणसाला जुळवते आणि साथ करुन देते त्यातील हे एक लेखक...
आज,हा लेख लिहताना मी खुश आहे की, आतापर्यंत रेल्वेत जुन्या ओळखीच्या लोकांपैकी हे दोन्हीही श्री.चंद्रकांत कुलकर्णी याचं माझे नाते जुळले..
मी खरच या बद्दल नेहमीच विचार करतो मी रेल्वेत बऱ्याच ज्येष्ट साहित्यिक/कलाकार आणि नवनिर्मिति जपणाऱ्या असंख्य लोकांची या माझ्या उपक्रमातील नव्याने ओळख झाली....
निर्माता अश्या लेखकांच्या लेखनीला कायम एक नविन आणि गूढ़ दृष्टी देवो....आभार !

सचिन सुशील



चंद्रकांत गोविंद कुलकर्णी

एक दिवस,एक लेखक

चंद्रकांत गोविंद कुलकर्णी
(कवी-अनुवादक)

हल्ली मुक्काम : कराड

मध्य रेल्वे मुंबईतुन ३८ वर्षाच्या दीर्घ सेवेनंतर निवृत्त.

सुमारे ३० वर्षांपासून काव्यलेखनाचा व्यासंग. विविध नियतकालिके,वृत्तपत्रे, दूरदर्शन या माध्यमांतून प्रसिद्धि...विविध वृत्ते,छंद यामधुन काव्यलेखन...
तसेच काही प्रसिद्ध हिंदी गीतांचे मराठीत आणि काही मराठी गीतांचे हिंदीत त्याच मुळ चालींसह अनुवादन...संत कबीरांच्या अनेक दोह्यांचा मराठी मध्ये 'समदोहि' भावानुवाद...सामाजिक आशयासह उपहासगर्भ आणि विनोदी काव्यलेखन...'पिंपळपाण' काव्यसंग्रह प्रकाशित...
माझे बालपण शिक्षण खेड्यात झाले.मैट्रिक परिक्षेनंतर परिस्थितिमुळे नोकरीसाठी बाहेर पडावे लागले.शाळेत झालेले संस्कार,आजुबाजूच्या ग्रामीण परिस्थितितील लोकगीत,भेदिक भारुड,भजने यामुळे शब्द सुरांशी नाते जुळले. आयुष्यातील ३८ वर्षे मुंबईत मध्य रेल्वे सेवेत नोकरीत गेले आणि नेरळ येथे वास्तव्य होते.
दररोज दैनंदिन प्रवासात व्यासंगी मित्र भेटायचे त्यांच्याशी वाड:मय चर्चा होत आणि त्यातूनच काव्यलेखनाचा छंद लागला.
शाळेत कविता पाठ करुन सादर करण्याचा छंद होता.वृत्त छंद यांची ओळख त्या वेळेस मनात पक्की रुजली. त्यामुळे शब्दांचे नेमकेपण लक्षात येवून छंदोबद्ध रचना करण्याची सवय लागली.
गजल,ओवी,इतर छंदातील रचना सोबत इतर अनुवादित प्रयोगही मी केलेत.रसिकांनी त्याचे प्रचंड स्वागत केले.

जस की मुळ गीत :
'उम्रभर नहीं भूलेगी वो बरसात की रात
एक अंजान हसीनासे मुलाकात की रात...'
अनुवादित गीत :
'जन्मभर मी न विसरेन पावसाळी रात।
सोबती ती अनोळखी कामिनी तिमिरात ।।'

मुळ मराठी गीत...
'कळा ज्या लागल्या जीवा मला की ईश्वरा ठाव्या ।
कुणाला काय त्याचे कोणाला काय सांगाव्या ।।
हिंदी अनुवाद :
'गुजरती जो गमे दिलपर,खुदा या खुद वहीँ जाने ।
किसीको क्या बया करना,न कोई गैर पहचाने..।।'

घरच्या परिस्थितिमुळे मला मैट्रिक पुढे शिकता आले नाही याची मनामध्ये अद्यापही खंत आहेच...
पण केवळ शिकल्यामुळेच माणसाची प्रगती होते असे नाही...शिक्षणामुळे माणसाचा दृष्टिकोण तयार होतो...
त्या काळात माझी शाळा सुटली ती कायमचिच...

'शाळेपाशी गेलो तेव्हा शाळा सुटली होती...।
अक्षरचाळे जोजवीणारे पाटी फुटली होती।।
भूक लागली आई आई हाक वीरे आकाशी...।
निंबोनिच्या झाडामागे आता चंद्र उपाशी ।।

जगात देव आहे की नाही यावर कितींदा विवाद होतात...माझा देव मात्र कवितारूपाने माझ्या सानिध्यात नित्य असतो.मनाच्या तरल आणि भावूक अवस्थेत तो मला शब्दरूपाने भेटतो.तेव्हा माझ्या सारखा आनंदी मीच असतो.त्यावेळी मला काहीही कमी वाटत नाही...

'कल्पनेत खुलली भांडारे मजपुढची ।
कविमनात माझ्या काय उणे या जगती ।।'

ही अक्षरपुजा ! तुम्हा रसिकांसाठीच आहे.तिचा प्रेमाने स्वीकार करावा...

'पुनर्जन्म कोणास कळाला ।
भूतकाळ गंगेत मिळाला,
वर्तमानची शब्दफुलानी,पूजा आरासावी ।।'

- श्री.चंद्रकांत गोविंद कुलकर्णी
==========================================================================

श्री. कुलकर्णी काका माझ्यासाठी कवितांची एक पर्वणी आहेत...
त्यांच्या कविता,अनुवादित कविता मला इतर कवींच्या तुलनेत खुप आवडतात. एक वेगळी लय,वेगळे सादरिकरण आणि नाविन्यपूर्ण लिखनशैली यांनी त्यांची प्रत्येक कविता सजलेली असते...अर्थात अश्या कविता मोहून घेतात...त्यांच्या मोहफुलांची जादुच् निराळी असते.
श्री.चंद्रकांत कुलकर्णी काका हे देखील माझ्या वडिलांचे ख़ास मित्र...३०-३५ वर्षापुर्वी श्री.एस आर पगारे,श्री.हेमंत वट्टमवार,श्री.सुधाकर पोहेकर,श्री.चंद्रकांत कुलकर्णी,सौ.हिरा बनसोड (प्रसिद्ध कवयत्री),सौ.सुरेखा देशपाडे आणि अन्य....या हौशि आणि कलाप्रेमी मित्रमंडळींनी एकत्र येवून मध्य रेल्वे मधे सर्वात प्रथम 'रेलप्रभा साहित्यिक मंडळ' ची स्थापना केली आणि त्यातून सांस्कृतिक आणि कलापूर्ण उपक्रम सुरु केले.सोबत माझ्या वडिलांनी 'रेलप्रभा' नावाच पाक्षिक सुरु केले आणि त्यात हौशी कवी आणि लेखकांना त्यांचे साहित्य प्रकाशित केले.
त्यात चंद्रकांत कुलकर्णी यांनी रेल्वेतील अतिशय तळाचा वर्गाचा कामगार 'फैलवाला' (गैंगमेन) या कामगारावर एक सुंदर कविता लिहिली होती आणि रेलप्रभा मध्ये ती प्रसिद्ध झाली होती.
फैलवाला...
'रुळासंगे रूळलेला,खिळयासंगे खिळलेला
रेल्वेचा कर्मचारी त्याच नाव फैलवाला...

कशासाठी पोटासाठी चाकरीची पायपीटी
सेवकरी वारकरी, जन जन दिलासाठी
खांद्यावरती हत्यार,हाती धरे बावटयाला...

घड़ो उन्हाळ्यात होळी,पडो पावसात धार
कुड़कुड़े गारठयात गड़ी होऊन बेजार
निसर्गाच्या चाकासवे रेल लावी रुळायला...

असा कर्मयोगी खरा,कर्मदरीद्री राहिला
पायतळीचा दगड, ठाव नाही कळसाला
ज्याच्या शिरावर आहे डोलाराच उभारला....

माझ्या लहानपणी मला या मासिकातली ही कविता फार आवडली होती आणि ख़ास त्याच कात्रण मी माझ्या व्यक्तिगत खणात ठेवली होती....ही गोष्ट साधारण १८-२० वर्षापूर्वीची....
बऱ्याच वर्षांनी मी माझ्या वडिलांच्या मार्गदर्शनाने रेल्वेतील गैंगमेन कामगारांच्या उपक्षिततेवर लक्षकेंद्रित करुन त्यांच्याविषयीच्या आत्मीयतेने 'गैंगमेन-अ बैकबोन ऑफ़ इंडियन रेल्वेज्...' या माहितिपटाची निर्मिती केली. ज्यात गैंगमेन कामगारांचे कार्य आणि जीवन पद्धती दाखवन्यात आली आहे. या प्रक्रियेत असताना मला नेमकी वरील कविता माझ्या हाताला पुन्हा लागली. त्यावेळी श्रीमान कुलकर्णी यांच्याशी काही ऐक संपर्क नव्हता...श्री.जयंत कुटुंबे यांच्या प्रयत्नाने त्यांच्याशी संपर्क झाला आणि या कवितेला गाण स्वरुप देताना 'माझ्या या कवितेच् गाण होन हा माझ्या कार्याचा गौरव आहे...' या शब्दात त्यांनी संमती आशीर्वाद दिला आणि मी ती कविता माझ्या माहितीपताच्या शीर्षक गीत म्हणून ठरविले. आणि हे गीत लोकशाहिर विठ्ठल उमप दादा यांच्या पहाड़ी आणि प्रदीर्घ आवाजात ध्वनिमुद्रित केले...
रिकॉर्डिंग नंतर आम्ही जेव्हा जेव्हा कोणत्या गैंगमेन कामगाराला ऐकवली आणि अजूनही एखाद्या शो च्या निमित्ताने हे गीत जेव्हा गैंगमेन ऐकतात तेव्हा त्यांच्या डोळ्यांत पाणी वाहू लागते...एवढी आत्मीयता या कवितेच्या शब्दात आहे आणि त्या शब्दांना लोकशाहिर विठ्ठल उमप दादा यांच्या सोनेरी आवाजाची साथ लाभली म्हणून हे गाण रेल्वे जगतात अजरामर झाले.
माहितीपट पूर्ण झाल्यानंतर त्याचा स्वागत समारंभ प्रयोग (प्रीमियर शो) मध्य रेल्वे ऑडिटोरियम येथे ०४ सप्टेंबर २०१४ रोजी श्री.सुबोध जैन साहेब( पूर्व सदस्य इंजीनियरिंग,रेल्वे बोर्ड दिल्ली/ पूर्व-महाप्रबंधक,मध्य रेल्वे/पश्चिम रेल्वे) यांच्या आणि तमाम रेल्वे अधिकारी,कर्मचारी आणि कामगार यांच्या उपस्थितीत करण्यात आला. त्यावेळेस या गाण्याचे विशेष कौतुक करण्यात आले आणि श्री.चंद्रकांत कुलकर्णी यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले...
ही खऱ्या अर्थाने या गाण्याच्या आणि या गैंगमेन कामगार विषयाच्या प्रती माझ्या निर्मिती कार्याच्या गौरवाची पोहच पावती मला मिळाली...
आजही कुलकर्णी काका मुंबईत आले की आम्ही आवर्जून भेटतो आणि मस्त कवितेच्या-गाण्याच्या मैफिलि सजवतो...
मी हे माझ सौभाग्य समजतो की, मला श्री.चंद्रकांत कुलकर्णी यांच्या सारख्या ज्येष्ट कवी यांची साथ लाभली...माझ्या माहितीपट निर्मितेत त्यांच्या कविताचे योगदान सोबतच आशीर्वाद आणि मार्गदर्शन मिळाले...
निर्माता त्यांच्या भविष्यातील निर्मितीसाठी अथांग कल्पनासागर बहाल करो हीच सदिच्छा !

सचिन सुशील




श्री.जयंत कुटुंबे (कवी)

एक दिवस,एक लेखक

श्री.जयंत कुटुंबे (कवी)

व्यवसाय : वरिष्ट निरीक्षक भांडार,मध्य रेल्वे.

३५ वर्षाच्या आतापर्यंतच्या अखंड रेल्वे सेवेत आत्तापर्यंत श्री.सुधाकर पोहेकर,हेमंत वट्टमवार, एस आर पगारे,बाळ कांदळकर अश्या विविध कला क्षेत्रातील मित्रांची दीर्घ मैत्री लाभली. त्यामुळे मला मध्य रेल्वेच्या कल्चर अकादमी मध्ये काही काळ काम करायची संधी मिळाली. या मित्रांसोबत मला 'चुल्लूभर पाणी' आणि इतर महत्वाच्या एकांकीकेमध्ये काम करता आले.
माझी खरी आवड ही काव्यलेखनाची आहे आणि गेली अनेक वर्ष विविध विषयांवर कविता केल्यात.बऱ्याचस्या माझ्या लिखित कवितांना काव्यसंमेलनात रसिकांची चांगली दाद मिळाली आणि सोबतच श्री.प्रवीण दवणे,श्री.राजा ढाले,श्री.रविंद्र पींगे या सारख्या मोठ्या सहित्यिकांकडून कौतुक आणि मार्गदर्शन मिळाले.
कराड येथील जेष्ठ कवी श्री.चंद्रकांत कुलकर्णी हे सुद्धा माझे जुने मित्र आणि मार्गदर्शक आहेत. या सर्वांच्या सहवासातून माझी कवितेची वाटचाल अखंड सुरु राहिली.
श्री.एस आर पगारे यांनी माझी 'कंफेशन' नावाची कविता अनेक कवी संमेलनातून 'मित्राची कविता'म्हणून सादर केली. तिथेही चांगला प्रतिसाद मिळाला.
लोकसत्ता वर्त्तमान पत्रात अनेक परिक्षण छापून आली. आणि अनेक दिवाळी अंकांमध्ये माझ्या कविता प्रसिद्ध झाल्या आहेत.
लवकरच माझा काव्यसंग्रह प्रसिद्ध होत असून त्यालाही रसिकांची दाद मिळेल अशी आशा करतो...
काही माझ्या आवडीच्या कविता...
जपणूक…
चांदण आता....
तितकस जाणवत नाही.
अनावश्यक ढगांचा परिणाम असेल
पण त्याचीही आता सवयच झालीय 
माझ्या इतकेच त्या आकशाला...
तसा आता....
आम्हाला एकमेकांकडे पाहायला वेळच् उरला नाहिये
कधी खिड़कीतून डोकावल की आकाश फार लांब गेल्यासारख वाटत 
अगदी माझ्या आवाक्या पलिकडे.
आणि मग.....
खिड़की बंद करावीच वाटते
आतल चांदण बंद करण्यासाठी...
-------------------------
ये पुन्हा....
पाहतो तुजला सखे मी थांबूनी वळनावरी
ओळखीचे शब्द येती अन पुन्हा ओठांवरी...।।धृ।।
आठवे आता कधीचा गोडवा त्या काळचा
विरह थोडासा जरी जिव व्याकुळ व्हायचा
रंगलो गण्यात आणि बोललो कवितेवरी...।।१।।
कैफ होता जीवनाला सुर होते सोबती
ना कधी केली तमा मी कोण होते भोवती
गूंजते कानात मैफल अजुन ही जादूभरी....।।२।।
ये पुन्हा तू विसरून सारी बंधने
जानुनी घे एकदा दोन्ही मनांची स्पंदने
बघ पुन्हा बदलेल जीवन बदलले सारे जरी....।।३।।

                                                                - जयंत कुटुंबे
==========================================================================

                                                                श्री.जयंत कुटुंबे हे माझ्या वडिलांच्या अत्यंत जवळच्या मित्रांपैकी एक...
माझ्या गैंगमेन या माहितीपटातील शीर्षक गीत 'फैलवाला' ही कविता माझ्या घरात खुप वर्षापासून होती...गैंगमेन करायच ठरल आणि ही कविता पुन्हा नव्याने हाती आली...त्यावेळी माझा आग्रह होता की हे गाण रिकॉर्डिंग झालेच तर महाराष्ट्राचे लाडके सुप्रसिद्ध शाहिर कै.विठ्ठल उमप दादा यांच्याच् आवाजात करायचे होते...परंतु ३० वर्षापुर्वी लिहिलेली ही कविता करणारे कवी श्री.चंद्रकांत कुलकर्णी हे बऱ्याच वर्षाआधी निवृत्त होवून परगावी राहायला गेले. रिकॉर्डिंग साठी गीतकाराची लेखी संमती आवश्यक होती...त्यावेळेस जयंत कुटुंबे यांनी त्यांना भेटून संमती दिली...
तसेच सध्या एस आर पगारे निर्मित 'येड़ा पाटिल' या चित्रपटासाठी त्यांनी उत्कृष्ट आणि संस्कृत शब्दात 'गंगाआरती' लिहली....
त्याला सुप्रसिद्ध गायक-संगीत संयोजन जितेंद्र तुपे आणि गायक प्रवीण डोणे ने त्याच्या पहाड़ी आवाजात आणि मी निर्माण केली आहे. लवकरच, त्यावर चित्रकरण होणार आहे.
अश्या या कवी मनाच्या माणसाला मानाचा मुजरा....

सुशील 




श्री.हेमंत वट्टमवार (अभिनेता-दिग्दर्शक-निवेदक)



एक दिवस,एक लेखक

श्री.हेमंत वट्टमवार
(अभिनेता-दिग्दर्शक-निवेदक)

व्यवसाय : रेल्वेत कार्यालय अधीक्षक म्हणून कार्यरत...

लहानपणी मला खरतर तबला वादक व्हायची इच्छा होती.घरात आई-मामा संगीत विषारद...वडिलांना नाट्यकलेचि आवड...अश्या वातावरणात आणि कलाजोपासना असलेल्या कुटुंबात झाली. त्यातच आईच्या आग्रहस्तव गण्याच प्रशिक्षण घेतल पण त्यातही मन रमल नाही. शाळेच्या गेट टू गेधर पासून नाटुकल्यांमध्ये आणि 'वयम मोठम बुडबुडा' आणि इतर नाटकांसाठी कुमार कला केंद्राची बक्षीस भाग अनेक पुरस्कार आणि नामांकन मिळवली.त्याच दरम्यान काही व्यावसायिक नाटकांसाठी बोलवन आल...परंतु अभ्यासावर् परिणाम होईल म्हणून घरच्यांनी थांबवल.तेव्हा पासून खऱ्या अर्थाने नाटकाची आवड निर्माण झाली...नंतरच्या काळात काही वर्ष घरची परिस्थिति मुळे कॉलेज शिक्षण घेण् जमल नाही आणि पायात जवाबदारीच्या बेडया अडकल्या परंतु त्यातही नात्काच वेड मनात घेवून मी जगत होतो.
पुढे रेल्वे सेवेत आल्यावर सुधाकर पोहेकर,एस आर पगारे,सुहास विरकर,विजय धुमाळ,बाळा कांदळकर अश्या अमूल्य मित्र आणि त्यांची साथ लाभली. आणि रेल्वेत सांस्कृतिक आणि कलेच्या माध्यमातून अनेक नाटक,कार्यक्रम आम्ही सुरु करुन त्यात सहभागी झालो. माझ्या कलागुणांच् कौतुकही झाले आणि प्रशंसा सुद्धा...त्यानेच आणखी आत्मविश्वासने अनेक नाटकांच्,एकांकिकांच् सादरिकरण केले.
'कारागार','चुल्लूभर पाणी','छोटेबड़े','भिंत','भिखमंगे:,
'अन्नदाता','आय कंफ़ेन्स','नको नको म्हणताना ठो ठो हो','मदारी' 'पार्टनर','ठाणेदार आया','दार कोणी उघड़त नाही' या एकांकीकेच्या सादरिकरणातून अभिनयाचा ऋणानुबंध टिकून ठेवला... सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून १९८२ ते १९९२ या वर्षांत सलग पुरस्कार प्राप्त झाले.
सुधाकर पोहेकर आणि सुहास विरकर यांच्यासारख्या दिग्दर्शक मित्रांनी मला खुप मोलाचे मार्गदर्शन केले .राज्यनाट्य स्पर्धेत 'आंदोलन',
'षडज','k9zone', ई नाटकात उत्तम अभिनय करू शकलो.
त्याचसोबत अनुवादक म्हणून २७ एकांकिका आणि ७ फुल लेंथ नाटक यांचा हिंदीत अनुवाद केला.
प्रा.कमलाकर कानेटकर सरांच्या मार्गदर्शनाने कृष्णदीप नाटकात श्रीकांत मोघे,श्याम पोंक्षे या सारख्या मोठ्या कलाकारांसोबत काम करता आले.
दूरदर्शनवर ज्ञानदीप कार्यक्रमात राजिव जोशींची 'हृदयाची गोष्ट' ही एकांकिका आम्ही सादर केली. आणि खुप गाजली.
एस एम् जोशींनी व्यक्तिशः पत्र लिहून ती सर्व केंद्रावर ही एकांकिका दाखवून विशेष कौतुक केले.
पुढे निवेदक म्हणून काम करण्याचा योग आला.'रंग माझा वेगळा' या कलापथकासोबत निवेदक म्हणून २० शो केले. रैल्वेतील मेघमल्हार,संगीत संस्कृति,विविधा अश्या अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे निवेदन लेखन तसेच निवेदन ही केले.
कवी म्हणून बऱ्याच कविता केल्या. ज्या मित्रांच्या आणि रासिकांच्या पसंतीत उतरल्या...
माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वपूर्ण आणि अमूल्य क्षण मी नाट्यदर्पण या संस्थेत घालवले. अनेक मोठ्या नामवंत आणि दिग्गज कलाकारांच्या सानिध्यात राहून अभिनय आणि दिग्दर्शन आणि बरच काही शिकलो. विशेष म्हणजे पंधरा वर्ष 'कल्पना एक,आविष्कार अनेक' आणि 'नाट्यदर्पण रजनी' या कार्यक्रमात सहभागी होऊ शकलो.
असे अनेक कार्यक्रम केले,रिकॉर्डिंग्स केल्या,डबिंग केल्या. हे करताना पैसे मिळाले नाही पण झपाटुन काम केल्याचे समाधान मिळाले. म्हणूनच रजनीच्या २५ वर्षाच्या क्षणांना आम्ही ९० मीन. ची फ़िल्म आणि ६० मीन. च्या ६ ध्वनिफितींचा सेट आम्ही निर्माण करू शकलो. ज्यात एका 'संकीर्ण' कैसट चे निवेदन मी केले. 'रजनी अशी रंगलीच' हे शीर्षक गीत मी लिहल. रेल्वेत जनरल मैनेजर फंक्शन चे रीडिंग्स सातत्याने २२ वर्षे मी केले.
अजूनही मध्य रेल्वे कल्चर अकडेमीची नविन टीम ला काही मदत सहकार्य गरजेचे असल्यास मी अत्यानंदाने त्यात सहभागी होतो आणि सहकार्य करतो...
आयुष्याच्या रंगमंचावर असेच अनेकानेक पात्र,संहिता,कथा माझ्या आयुष्यात माझे अतिशय जवळचे मैत्री रुणानुबंधात मिळत गेले आणि मैत्री वाढत गेली.वरिष्ट मान्यवर,नटश्रेष्ट आणि आजवर हजारो सहकलाकारांनी माझ्या कलेच सोन केल.
शाळेच्या काळातील नाटुकलीच्या वेळेस पहिल्यांदा तोंडाला रंग लावला त्याची चमक अजुन उतरली नाही...ती चमक आज रेल्वे सेवेत ३५ वर्षे पूर्ण केल्यानंतरही कायम आहे.
एकखांबि तंबू असल्यामुळे घरातील जबाबदारी असल्यामुळे नोकरी करता करता कलेची सेवा करता आली.मुलांच्या करिअर ला महत्व आणि वेळ दिला...
आता रिटाएरमेंट नंतर पुन्हा जमेल तस काम करुन पुन्हा रंगभूमीशी जुळण्याचा विचार आहे.
- हेमंत वट्टमवार
==========================================================================

हेमंत काकांना मी लहानपनापासूनच पाहत आलो आहे. माझ्या वडिलांचे ते मध्य रेल्वे कल्चर अकादेमी मधील ते अत्यंत जवळचे मित्र...
त्याच सोबत अंतरविभागीय कार्यक्रमात मला देखील त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक छोटीशी भूमिका करण्याची संधी मिळाली होती.आणि मध्य रेल्वे ऑडिटोरियम चा स्टेज मला पहिल्यांदा अनुभवायला आणि माझी कला सादर करायला मिळाला...
हेमंत काकांविषयी खुप काही बोलन्या सांगन्यासारख आहे.
माझ्या घरात आजही त्यांच्या कवितांची बुक आहेत.त्यातील ताजमहल ही कविता अप्रतिम आणि उल्लेखनीय आहे. त्याच सोबत या कवी मंडळींची खासियत म्हणजे त्यांनी त्यांच्या तरुणपनाच्या काळात 'ऑफिस मधील उखाणे' असा संग्रह लिहिला.
त्यात बॉस,पिओन,सहकर्मचारी,ऑफिस मधील एक आवडती ती... अश्या अनेक व्यक्तींवर उखाणे बनवले आहेत. मी नंतर ते नक्कीच शेयर करेल आपल्या सोबत ते उखाणे...
सुधाकर पोहेकर काका आणि हेमंत वट्टमवार काका समकालीन अभिनय संपन्न आणि नटश्रेष्ठ आहेत...पण या दोघांनाही मी जेव्हा माझ्या चष्मयातून पाहतो तेव्हा मला भारतीय चित्रपटातील सर्वात उत्कृष्ट अशी 'ओम पूरी व् नासिरिद्दीन शाह' ही बाप जोड़ी डोळ्यांसमोर उभी राहते.
खुप एनर्जी मिळते मला वारंवार अश्या काकालोकांकडून.... ज्यांनी आपल् समग्र जीवन इतर भौतिक जवाबदरयंसह कलेला वाहिल...कलेशी एकरूप राहिले.
अश्या या एका उत्कृष्ट नतश्रेष्ठ आणि बहुआयामी व्यक्तिमत्व श्री.हेमंत वट्टमवार सरांना मानाचा सलाम करतो...आणि भविष्यासाठी शुभेच्छा..

सचिन सुशील.






विजय पुंडलिक जाधव (गायक-कव्वाल-गीतकार)


एक दिवस एक लेखक

विजय पुंडलिक जाधव (गायक-कव्वाल-गीतकार)

व्यवसाय : निवृत्त कर्मचारी,मध्य रेल्वे...

हल्ली मुक्काम : तळेगाव-दाभाडे,पुणे

लहानपणी गावातील पाटला सोबत काही कारणांवरुण वाद झाला पुढे हा वाद कोर्टापर्यंत गेला आणि माझे वडीलांची परिस्थिती हातावरची आणि दुर्बल असल्यामुळे पाटीलाने ही केस जिंकली पण पाटलाच्या अन्याय अत्याचाराला आळा घालयचा म्हणून पुढे वडिलांनी पुन्हा सिन्नर कोर्टात केस दाखल केली.
आणि या केसचे वकील पत्र डॉ.बाबासाहेबांनी घ्यावे म्हणून ते बाबासाहेबांना भेटले.केस सिन्नर कोर्टात न घेता मुम्बईला घ्या अस बाबासाहेबांनी माझ्या वडिलांना सांगितले पण आमची परिस्थिति नसल्यामुळे त्यांना सिन्नर कोर्टातच ही केस लढवण्याची विनंती केली.अखेरीस डॉ.बाबासाहेब हे सिन्नर ला कोर्टात आले आणि ही केस जिंकून सावकारीवृत्ति विरुद्ध आवाज उठवून त्याला आळा बसवला...
आणि याच कारणाने माझ्या मनात डॉ.बाबासाहेबांच् स्थान खुप मोठ आणि भक्कम झाल. आणि लहानपनापासूनच मी भीमगीते म्हणू लागलो खेड्यापाडयात भीम जयंती निम्मित गायनाचे कार्यक्रम सादर करू लागलो...
दरम्यान, त्या काळात दलित पँथर ची चळवळ सर्वत्र जोमाने उभी राहायला लागली. अन्याय अत्याचाराला वाचा फुटू लागली त्यात मी गाण्याच्या,कव्वालीच्या आणि प्रबोधन गितांच्या रूपाने सर्व समाजात,रास्तो-रस्ती, खेडोपाडी आणि गाव गाव गायनाने सादर करू लागलो. १९७० पासून मी ही चळवळीत सक्रीय झालो.
त्यातच, पोटापाण्याच्या व्यवस्थेसाठी नाशिक मध्ये आलो.तिथे सुमारे १५-२० वर्षे वात्सव्य केले.त्याच दरम्यान तिथले सुप्रसिद्ध गीतकार-लेखक भीमसेन चंद्रमोरे यांच्याशी भेट झाली आणि पुढे त्यांच्या कविता आणि कव्वाली माझ्या गाण्यात गावू लागलो.
परंतू रेल्वेसेवेत कार्यरत असल्यामुळे पुन्हा मनमाड ला यावे लागले आणि आणि त्यानंतर मनमाड ते खंडळा-लोणावळा अशी बदली झाली. कामाच्या ठिकाणी 'पॉइंट्समैन' या पदावर कार्यरत असल्यामुळे काम दिवसरात्र अखंड चालायचे त्याच दरम्यान खंडाळा बोगदयाच काम सुरु झाल. जंगलात सर्वत्र अंधारात साप,काटे,विंचु,वाघ इ.प्राण्यांची भीती असायची सतत...मग दिवसभर काम करुन आम्ही सर्व कामगार त्या जंगलाच्या ठिकाणी रात्री शेकोटी करुन एकत्र बसत असू. आणि विरंगूळा म्हणून सर्वांना गावून दखवायचो. हाच विरंगूळा माझ्या कमातील साहेब लोकांना आवडू लागला आणि पुढे त्यांच्याघरी गाण्याच्या कार्यक्रमाचे निमंत्रण येवू लागली. डॉ.बाबासाहेबांच्या जयंतीला आमच्या कार्यालयात आवर्जून माझ्या गायनाचे कार्यक्रम असायचे.
पुढे याच ठिकाणी मी सेवेतून सेवानिवृत्त झालो. आणि रिकामा वेळ वाया जावु नये म्हणून कामशेत येथे माझ्या काही जुन्या-नव्या मित्रांच्या सहाय्याने 'कला विकास महासंघ' ची स्थापना केली व् आता त्या संथेच्या कलेच्या माध्यमातून समाजाची सेवा करीत आहे.
१९७० पासून ते आज वर्ष २०१५ पर्यंत मी गायन करत आलो. आणि पुढेही गाईल.बऱ्याच मोठ्या मोठ्या ठिकाणी,जयंती कार्यक्रमात नावलौकिक मिळाला पण त्याची दखल घेतल्या गेली नाही आणि मी उपेक्षितच राहिलो. याची खंत आज वयाच्या ६७ व्या वर्षी खोल काळजात रुतून आहे.
==========================================================================

आयु.विजय जाधव हे माझे अत्यंत निकटवर्तीय नातेसंबंधातील महत्वाची व्यक्ती आहेत.
भीमगीते,प्रबोधन गीते,कव्वाली याच्याच सोबत आपल्या गोड आवाजातील त्यांचे प्रेमगीतही तेवढीच् सुंदर आणि सुरेल आहेत...त्यातील माझ्या आवडीच् त्यांनी लिहलेल एक गाण म्हणजे...
"तुम्हे और क्या दूँ में दिल के सिवाय तुमको हमारी नजर लग जाएँ..." या हिंदी गाण्याच्या चालीत त्यांनी रचलेल त्याचं...
'तुझी माझी जोड़ी बघाया जमल सार गाव,तू माझी मस्तानी मी तुझा बाजीराव....तू माझी मस्तानी मी तुझा बाजीराव...' हे गाण...
काही घटना माणसाच्या मनावर सखोल परिणाम करुन जातात आणि आजन्म त्या कलेच्या रुपात मनात जपल्या जातात आणि यातूनच कलाकार जन्माला येतात आणि घड़तात...
आणि म्हणूनच विजय जाधव यांच्या सारख्या उपेक्षित कलाकारविषयी आज मला लिहीने गरजेचे वाटले.
अश्या महान गायकाला शतशः प्रणाम....सलाम !🙏🏻💐💐
सचिन सुशील

सुधाकर पोहेकर (दिग्दर्शक-अभिनेते)



एक दिवस,एक लेखक


सुधाकर पोहेकर
(दिग्दर्शक-साहित्यिक)

व्यवसाय : मध्य रेल्वेत व. मं. इ (कार्य ) कार्यालयत सीनियर सेक्शन इंजिनियर म्हणून १९८२ ते ३१ जाने.२०१५ पर्यत कार्यरत नंतर निवृत्त..
 
घरात नाटकाची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही शालेय जीवनापासून नाटकाची आवड . धारावी सारख्या विभागात " मनी आर्ट " मुम्बई नावाने १९७३ साली नाट्य संस्थेची उभारणी करून महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्राच्या नाट्यस्पर्धेत तसेच महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत भाग घेवून सतत विविध् सामाजिक , राजकीय, वैचारिक विषयांवर नाट्यप्रयोग केले . " प्रेरणा , ज्वालामूखी , अंधार - यात्रा , असच आणि इतकंच , रसगंधर्व , आषाढातील एक दिवस ,प्रत्येक मनातली तक्षशिला , यात्रिक , पुत्र , जान्हवी , मृन्मयि , आक्रीत , , अभिहत , महापूर , शतकावली, षडज सारखी नावीन्यपूर्ण विषयावरनाटके केली . नट , दिग्दर्शक , नेपथ्य , प्रकाश योजना या सर्व नाट्य् अंगांवर हुकुमत . . बहुतेक सर्व नाटके पारितोषीक प्राप्त तसेच अभिनय , दिग्दर्शक , प्रकाश योजनाकार व नेपथ्या साठी पारितोषिके मिळवली . रेलवेच्या आंतर मंडलीय नाट्य स्पर्धेत सतत पाच वर्षे सर्वोतम एकांकिका , दिग्दर्शक व कलाकार म्हणून पारितोषिके प्राप्त केली .
" चुल्लुभर पानी , श्रन्त श्रन्त , मदारी , आय क्न्फेस , कारागार ,काहूर , पार्ट्नर आदि हिंदी व मराठी दोन्ही भाषेत एकांकिका तसेच जी ए कुलकर्णी च्या कथेवर " यात्रीक " भारत सासण् " रसग्धर्व " वि वा शिरवाडकर कांदबरी जा न्हवी , मनोहर शहाणे - पुत्र , हे नाटक दिग्दर्शित केले.
महाराष्ट्र संगीत नाट्य स्पधेत " आषाढ़ातील . एक दिवस " नाट्यप्रयोग खूप नावजला गेला . १९९९ साली रेल्वेतील सांस्कृतिक कार्यासाठी 'प्रबंधक पारितोषिक' ने सन्मानित केले . प्रेमानंद गजविंच्या " किरवंत " नाटकात डाक्टर श्रीराम लागू दिग्दर्शित व अभिनीत नाटकाचे ९० प्रयोगात सुहास जोशी सह भूमिका केली . तसेच चाणक्य विष्णू गुप्त या डाक्टर लागू च्या नाटकात अविनाश नारकर , सुकन्या कुलकर्णी सह भूमिका . योजना प्रतिष्ठान च्या " तयाचे प्रेम खरे" नाटकाचे दिग्दर्शन . संजीव कोलते ना मालिकेसाठी सह दिग्दर्शक म्हणून काम केले तसेच गिरिश ओक , सौमित्र , शरद पोक्शे , संजीव कोलते , कुमार सोहनि समकालीन व स्नेही कलाकारांसोबत अभिनय आणि दिग्दर्शन कार्य....
सतत नाटके पाहणे . नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न . वाचन ,सिनेमा पाहणे हा त्यांचा छंद...
रंगभूमी आणि नाट्य कलेसाठी त्यांनी स्वतःच अखंड आयुष्य समर्पण केल.
सुधा काकांच् माझ्या आयुष्यात महत्वाच् स्थान आहे.
माझ्या साहित्यिक आणि निर्मितीमध्ये सुरवाती पासूनच मला त्यांचे मार्गदर्शन मिळाले. 'गैंगमेन' च्या प्रारंभिक निर्मिती टप्प्यात कथा-पटकथा कशी लिहायची याची जान त्यांनी मला करुन दिली.
एखाद्या विषयावर,कथा-पटकथे वर 'आउट ऑफ़ बॉक्स' जावून कसा विचार करायचा त्याला कशी ट्रीटमेंट द्यायची आणि परिपूर्ण स्वरुप प्राप्त करुन द्यायच हे त्यांच्याकडून मला शिकायला मिळाल आणि अजूनही हक्काने मिळत.
'प्रेमात पडायच नाही'
ही त्यांची शिकवण (स्ट्रिक्ट वार्निंग) मला कायम मिळत आली. त्यामुळे मला माझ्या कोणत्याही निर्मितीच्या तळाशी पोहचुण त्याचा अभ्यास आणि शोध घेता आला.
आज रेल्वेतून निवृत्ति घेतल्या नंतरही सुधा काका विविध नाट्य आणि संगीत प्रोजेक्ट मध्ये कार्यरत आहेत.
लवकरच त्यांच्या सोबत एका अर्थपूर्ण नाटकनिर्मिति संदर्भात स्क्रिप्ट वर काम सुरु आहे.
भविष्यात सुधा काकांना उत्तम आरोग्य,नवनिर्मिती क्षमता आणि माझ्या सारख्या असंख्य कलाकारांना त्यांच्या कलाजीवण अनुभव समृद्धतेतून मार्गदर्शन करण्याची इच्छा व्यक्त करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा... अश्या कलाजीवन अनुभव संपन्न ज्येष्ट कलाकारास माझा मानाचा मुजरा आणि सलाम... 

सुशील.



सदानंद पुंडगे (लेखक)


एक दिवस,एक लेखक...

सदानंद पुंडगे (लेखक)

व्यवसाय : प्राध्यापक,ज्ञानोपसाधना महाविद्यालय,परभणी

प्रकाशित साहित्य-पुस्तक-
'गैंगमेन' (२००५,आत्मकथा)
प्रकाशन : कौन्टीनेंटल प्रकाशन,पुणे

रैल्वेमधील 'फैलवाला'(गैंगमेन) कामगाराच्या घरात जन्म झाला. हलाकीच्या परिस्थितीत नोकरी करुन शिक्षण पूर्ण केले. या परिस्थितीत त्यांचा कॉल बॉय-गैंगमेन-पेंटर-असा झालेला प्रवास....

                                              'झुक झुक झुक आगीन गाडी
                                               धुरांच्या रेषा हवेत काढी...
                                                   पळती झाडे पाहुया,
                                              मामाच्या गावाला जावुया....'

ही कविता ऐकायाला किती गोड वाटते.मात्र त्या आगीन गाडीने आमच्या जीवनाची किती होळपळ केली ते आमचे आम्हालाच माहिती...
ही रेल्वे प्रथम सुरु करते वेळी नैसर्गिक अडचणी फार होत्या.त्या काळी कर्नल ग्रैंट यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटले आहे
आज या भारतातील रेल्वे जिथुन धावतात ते उंच डोंगर,घनदाट जंगले भेदत जाणारे लोहमार्ग ही इंजीनियरिंगची कौतुकास्पद नमूने समजले जातात पण खरी कमाल इथल्या मजूर गैंगमेनची काम आहेत.
आगीन गाडीच्या खाली जे रुळ् असतात त्यांना जीवापाड जतन करतो...संभाळतो. त्याच्या खाली जी गिट्टी असते त्यावर रोज गाड्यांमधुन घाण पड़ते.त्या घाणितच गैंगमेन ला उन्ह वारा पाऊस अंगावर घेवून ढोर काम करावे लागते.त्याला आपले गाव सोडून मिलोमिल गैंग सोबत भटकाव लागत.
मी रेल्वेतल्या गैंगमेन क्वार्टरच्या गाव संस्कृतीपासून तुटलेल्या वातावरणात कॉलबोय ते गैंगमेन ते पि डब्लू आय ते पेंटर आणि नंतर ज्ञानोपासक महाविद्यालयात प्राध्यापक असा माझ प्रवास...
हे अस जीवन मला मराठी सहित्यामध्ये मला वाचायला मिळाले नाही.अजूनही दलित साहित्यांमध्ये असे अनेक अंधार कोपरे येणे बाकी आहेत.मला माझ हे सार रैल्वेतल जीवन आत्मकथनाच्या रुपात लिहावस वाटल. ते मी आपल्या समोर मांडले आहे.
- लेखक सदानंद पुंडगे
==========================================================================

मराठवाड्यातील इंगोलि (हिंगोली) सारख्या ग्रामीण भागातील तो काळ आणि त्यात वात्सव्य करणारे गैंगमेन कामगार यांच्या कौटुंबिक जीवन आणि कार्यजीवन पद्धत्ति अतिशय प्रभावीपने तिथल्या ग्रामीण भाषेत लेखकाने मांडल्या आहेत. त्या काळात रेल्वे तील नोकरी म्हणजे अतिउच्च दर्जाचा राजाश्रय सेवा समजल जात असत. अनेक बेरोजगार-अशिक्षित शेतात राबनारे मजूर रेल्वे मधील नोकरी मिळने भाग्य समजत होते आणि कोणत्याही शैक्षणिक अटिशिवाय लाइन टाकण्याच्या स्थळी लोकांना हजेरीवर कामाला घेत त्या काळात गैंगमेनला राहायला 'गैंगहट' नव्हत्या त्याऐवजी ते आपल्या कुटुंबासहित वागिनीत (वैगन-मालगाड़ी डब्बा) घर म्हणून निवारा करत. आणि मिलोमिल गावोगाव या गैंग आपल्या कामानिमित्त पुढे जात असत.
माझ्या माहितिपटाच्या निर्मितिमधील बराचसा अभ्यास या आत्मकथानातून झाला आहे तसेच मला माझ्या निर्मिती आणि संशोधन प्रक्रियेत या पुस्तकाची आणि लेखक सदानंद पुंडगे यांच्या आत्मकथानामुळे जुन्या काळातील गैंगमेन कामगार त्यांचे कौटुंबिक,सामाजिक आणि कार्यजीवन निर्मितीत अभ्यासणे आणि मांडणे यात अतिशय मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
प्रवास करताना आपण ज्या रुळावरून रात्रंदिवस निर्धास्त प्रवास करतो त्याचे सर्व श्रेय या गैंगमेन कामगरांचे आहे...हजारो प्रवास्यांचे प्रवास सुखरूप व्हावे म्हणून हे कामगार सर्व मौसमात रुळात,बोगद्यात्,घाटात,जंगलात सतर्कतेने रुळांची देखभाल करतात आणि वेळप्रसंगी रेल्वे ट्रेनखाली याच कामगाराच्या प्राणाची आहुती दिल्या जाते काम करता करता...
अश्या या कामगरांची आणि त्यांच्या कार्याची दखल घेवून त्यांचे महत्त्व लक्षात घेवून त्यांचा सन्मान करने आवश्यक आहे..माझ्या 'गैंगमेन-अ बैकबोन ऑफ़ इंडियन रेल्वेज्' या माहितीपट ५ वर्षाच्या संशोधन आणि निर्मिती प्रक्रियेत मला या पुस्तकाने एक दिव्य आणि वैचारिक दूरदृष्टि दिली.

त्याबद्दल मी लेखकाचा कायम ऋणी आहे आणि कायमच राहील...हे पुस्तक आपण सर्वानी एकदा तरी वाचावे...

                                                                                                                     सचिन सुशील.
                                                                                                       निर्माता-दिग्दर्शक-लेखक
                                                                 'गैंगमेन-अ बैकबोन ऑफ़ इंडियन रेल्वेज्' माहितीपट.