Monday, 19 October 2015

मेहता,चंद्रवदन चीमनलाल

एक दिवस,एक लेखक


मेहता,चंद्रवदन चीमनलाल
(६ एप्रिल १९०१–१९९२).


प्रख्यात गुजराती नट, नाटककार तसेच कवी, निबंधकार आणि समीक्षक.

जन्म सुरत येथे. मुंबई विद्यापीठातून ते बी.ए. झाले.काही काळ नवजीवनचे संपादकही होते. १९३८ ते ५४ ह्या काळात ते ‘आकाशवाणी’वर नोकरीस होते आणि अहमदाबाद केंद्राचे प्रमुख म्हणून ते निवृत्त झाले. १९६७ मध्ये त्यांना भारत सरकारने ‘पद्मश्री’देऊन गौरविले. १९७२ मध्ये त्यांना नाट्यलेखनासाठी संगीत नाटक अकादेमीचा पुरस्कार प्राप्त झाला. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नाट्य परिषदांना ते तज्ञ प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले. बडोदा येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठात तसेच अहमदाबाद येथील गांधी विद्यापीठात नाट्यविद्येचे अभ्यागत प्राध्यापक म्हणून ते काम करत होते.
चंद्रवदन मेहतांचे वडील बडोद्यास रेल्वेमध्ये नाकरीस असल्याने त्यांचा रेल्वेशी व तेथे काम करणाऱ्या माणसांशी प्रदीर्घ काळ व जवळून संबंध आला. यातूनच त्यांचे सर्वोत्कृष्ठ शोकात्म नाटक 'आगगाडी' (१९३७) उतरले. रेल्वेत काम करणाऱ्या व्यक्तींच्या जीवनाची त्यांना असलेली इत्यंभूत माहिती व त्यांच्याशी असलेले सहानुभूतिपूर्ण जवळिकीचे संबंध यांचे पुरेपूर प्रत्यंतर या नाटकांतून येते.
मेहता १९२५ च्या सुमारास मुंबईत शिकत असताना नाटकांची खूपच चलती होती; तथापि नाटकांतील स्त्रियांच्या भूमिका पुरुष करायचे. चंद्रवदन मेहतांनी गुजराती रंगभूमीला दिलेली अतिशय मोलाची देणगी म्हणजे त्यांनी त्याकाळी सर्वांत आधी नाटकातील स्त्रियांच्या भूमिका स्त्रियांनीच करण्याचा पायंडा पाडला. मेहता केवळ चांगले नाटककारच नव्हते, तर ते अभिनयकुशल श्रेष्ठ नटही होते. त्यांनी लिहिलेल्या अनेक नाटकांत त्यांनी स्वतः उत्कृष्ट भूमिका केल्या आणि त्या आजही अनेकांच्या चांगल्या स्मरणात आहेत. त्यांच्या नाटकांत आशयाचे नावीन्य, जिवंत व चमकदार संवाद व विनोद हे गुणविशेष प्रकर्षाने आढळतात.
त्यांनी कविता, निबंध, आत्मचरित्रपर लेखन, समीक्षा इ. प्रकारांत विपुल लेखन केले असले, तरी गुजराती साहित्यात ते एक श्रेष्ठ नाटककार व आत्मचरित्रपर लेखनाचे उत्कृष्ट गद्यशैलीकार म्हणूनच विशेष प्रसिद्ध आहेत.
नाटक व रंगभूमी हे गेली अनेक वर्षे त्यांच्या मोठ्या आस्थेचे व भावबंधाशी निगडीत असलेले विषय राहिले आहेत. लोकांमध्ये चांगली नाट्यभिरूची निर्माण व्हावी म्हणून तसेच आपल्या सुरत विभागात खरीखुरी दर्जेदार रंगभूमी प्रस्थापित व्हावी म्हणून त्यांनी आटोकाट प्रयत्न केले.
त्यांची अतिशय गाजलेली नाटके अशी :
'नागाबाबा' (१९३०),'आगगाडी' (१९३७), 'हो-होलिका', 'प्रे मनुं मोती अने बीजां नाटको' (१९३७), 'संताकुकडी' (१९३७), 'धारा सका नर्मद' (१९३७), 'मूंगी स्त्री' (१९३७), 'धरा गुर्जरी' (१९४४),'पांजरापोळ' (१९४७), 'रंगभंडार अने बीजा नाटको' (१९५३),इत्यादी. त्यांनी श्रेष्ठ गुजराती कवी अखो भगत व नर्मद यांच्या रंगभूमीची सुरुवात करून ती गुजराती जनतेपर्यंत नेऊन पोहोचविली. त्यांची नाटके सामाजिक, ऐतिहासिक,पौराणिक, चारित्रात्मक, प्रहसनात्मक इ. प्रकारांत आहेत. चंद्रवदन मेहता आणि के. एम्. मुनशी यांनी त्याकाळी मृतप्राय झालेल्या व्यावसायिक व पारंपरिक रंगभूमाला शेवटचा धक्का देऊन तिला कायमची मूठमाती दिली आणि नव्या आधुनिक रंगभूमीचे गुजरातीत प्रवर्तन केले. मेहतांनी काही गाजलेल्या यूरोपियन नाटकांचे गुजरातीत अनुवादही केले आहेत.
त्यांनी लिहिलेल्या कवितांचा 'इलाकाव्यो' (१९३३) हा संग्रह असून त्यात त्यांच्या स्कुट कविता आहेत, तर 'रतन' (तिसरी आवृ.१९३९) हे त्यांचे दीर्घकाव्य आहे. यातील अनेक कवितांत बहिण-भावातील निरागस, विशुद्ध प्रेम हा विषय आलेला असून ह्या कवितांना त्यांचा असा खास गोडवाही आहे. 'यमल' (१९२६) मध्ये त्यांनी पृथ्वी वृत्तात रचलेली १४ सुनीते असून ती अतिशय सुंदर उतरली आहेत.
मेहतांची नाटकाइतकीच महत्त्वपूर्ण साहित्यनिर्मिती म्हणजे त्यांच्या आत्मचरित्रपर लेखनाचे तीन खंड होत. 'बांध गठरियां', 'छोड गठरियां', 'रंगगठरियां' (३ भागांत १९५४).
'नाट्यगठरियां' (१९७०) हा त्यांचा दर्जेदार समीक्षापर ग्रंथ. ह्या खंडांमध्ये त्यांच्या प्रसन्न, स्वतंत्र व उत्कृष्ट अशा गद्यशैलीचे दर्शन घडते. ह्या गद्यलेखनातील त्यांची खास व स्वतंत्र शैली वाचकांस नेहमीच आकृष्ट करत आली आहे. गुजराती गद्याचे एक असामान्य शिल्पकार म्हणून त्यांचे स्थान फार वरचे आहे. त्यांनी काही लघुकथाही लिहिल्या आहेत; तथापि त्यात ते यशस्वी झाले नाहीत. वयाच्या ८५ व्या वर्षीही ते अतिशय कार्यक्षम आहेत. एक प्रसन्न व पट्टीचे वक्ते म्हणूनही त्यांचा लौकिक आहे.
त्यांच्या मौलिक साहित्यसेवेचा गौरव गुजराती रसिकांनी त्यांना १९७८ मध्ये ‘गुजराती साहित्य परिषदे’ चे अध्यक्ष म्हणून निवडून देऊन केला. १९७१ मध्ये त्यांच्यानाट्यगठरियांस साहित्य अकादेमी पुरस्कार मिळाला. १९३६ मध्ये गुजरातीतील सर्वोच्च असा ‘रणजितराम सुवर्णचंद्रक’ ही त्यांना मिळाला.
‪#‎माहिती‬ ‪#‎सौजन्य‬ : Copyright © 2015. सर्व हक्क मराठी विश्वकोश कार्यालयाकडे राखीव. संकेतस्थळ निर्मीती, सीडॅक जिस्ट, पुणे यांच्यामार्फत करण्यात आली.
=========================================================================
माझ्या रेल्वे माहितीपट या मोहिमेतील उम्मेदीच्या काळात चंद्रवदन मेहता याचं 'आगगाडी' हे पुस्तक वाचण्यासाठी हातात आले. आणि रेल्वेची जुनी संस्कृती माझ्या मनात खोलवर उतरली.
खरतर माझ्या घरात वडिलोपार्जित पिढ्यांपासून आजोबा,काका,वडील या तीन पिढ्या रेल्वेसेवा करत आल्या आहेत.
गैंगमेन या विषयला जेव्हा मी माझे शोधकार्य सुरु केले तेव्हा सर्वात महत्वाचे होते की मी प्रत्यक्षात लाइन मध्ये जावून या कर्मचारी आणि त्यांच्या कार्यासंदर्भात माहिती मिळवणे. आणि त्यात माझ्या वडिलांच् एक वाक्य ' गैंगमेन बघायचा आणि समजायचा तर घरात किंवा ऎ/सी ऑफिस केबिन मध्ये बसून त्याची माहिती नाही मिळणार त्यासाठी बाहेर पडावेच लागेल' या प्रमाने दर शनिवार-रविवार सुट्टीच्या काळात खंडळा-लोणावळा,कसारा-इगतपुरी,भुसावल,मनमाड ई. ठिकाणी दौरे सुरु केले. आणि दरम्यान अनेक जुन्या रेल्वेतील जीवनशैली आणि वास्तव्य असलेले लोक,घर,बंगले,आणि ऑफिस पाहण्यात आले.सोबतच जुन्या काळातील डब्लू सी एम् 5,डब्लू सी एम 4, डब्लू सी ऐ ऍम 2, या जुन्या इंजिन मध्ये जाण्या येण्याचा आणि जवळून पहन्याचा योग आला होता, आईचे वडील बी आय (ब्रिज इंस्पेक्टर) व् घाट ड्राईवर होते. त्यामुळे लहान पनापासूनच अस्सल रेल्वे कुटुंबाच्या संस्कारात् राहनिमाण झाले. आणि आजोबा आणि वडिलांकडून जुन्या जमान्यातील पासूनच रेल्वे जीवण ऐकत आलो होतो. ब्रिटिश काळापासून सुरु झालेले रेल्वे जीवन 'ब्रिटिश पायलट' या सारख्या उच्च कैटगरी मधून स्वतंत्रकाळा नंतरहि बऱ्याच वर्ष कायम राहिली.
पण त्या काळातील रेल्वे प्रणाली आणि त्यातील कर्मचारी यांच्या विषयी नेहमीच आतुरता आणि आवड राहिली होती...परंतु तो काळ पाहता आणि अनुभवता आला नाही ही मनात कुठेतरी खंत होती...
परंतु, चंद्रवदन मेहता यांच्या या पुस्तकाने त्यातील एकांकीकेच्या रूपाने अनेक पात्रांशी नव्याने ओळख आणि माहिती मिळाली.
रेल्वेतील कॉलबॉय,डरावरखाना,टनटेबल,कोपरेटी या सारख्या शब्दांचा आणि पदांचा आणि त्यांच्या कामाचा अर्थ समजला. आणि रेल्वे सारख्या प्रदीर्घ विषयावर काम करणे सहज सोपे झाले.
हे सर्व श्रेय केवळ चंद्रवदन मेहता यांच्या 'आगगाडी' या पुस्तकालाच...
सुशील.




No comments:

Post a Comment